कर्जमाफी योजनेच्या घोषणेवर शेतकरी संघटनेचे नेते म्हणतात,

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेवर शेतकरी संघटनेच्या नेत्यांची मत जाणून घेतली. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही, असे त्यांचे मत आहे.

कोल्हापूर - युती शासनाच्या काळातील जुनी कर्जमाफी योजना अजून सुरूच आहे, तोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत पुन्हा थकबाकीदार शेतकऱ्यांचीच चांदी होणार असून, ज्यांनी महापूर, अवकाळी पावसाचे संकट झेलून कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे केली, त्यांना मात्र शासनाने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. 

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेवर शेतकरी संघटनेच्या नेत्यांची मत जाणून घेतली. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही, असे त्यांचे मत आहे.

हेही वाचा - लिफ्टच्या बहाण्याने तोंडाला लावायला रूमाल दिला अन्... 

या कर्जमाफीने दिलेला शब्द अपूर्णच

कर्जमाफीमुळे शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार नाही. त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण होत नाही.  मागील वर्षीच्या दुष्काळामुळे थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना थोडाफार लाभ मिळेल. पण महापूर, अतिवृष्टी यामुळे जे प्रचंड नुकसान झाले आहे त्या पिकांना नुकसान भरपाई नाही आणि कर्जाची मुदत जून २०२० पर्यंत असल्याने ते थकीत नाहीत, म्हणून त्यांच्या पदरात काहीच पडणार नाही.
- राजू शेट्टी, माजी खासदार

कर्जमाफीमुळे लोक असमाधानी

कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या कर्जमाफीने केले. या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. तसेच संपूर्ण कर्जमाफी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे दोन लाख माफ करून काहीही होणार नाही. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण केले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी भरडत आहेत. त्यामुळे या कर्जमाफीमुळे लोक समाधानी नाहीत. शेतकऱ्याचे कोणी कर्ज वसूल करण्यास आले तर झोडपून काढू. मुख्यमंत्र्यांनीही घमेंडीत राहू नये. 
- रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना

डोंगर पोखरुन उंदिर काढल्यासारखी घोषणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा म्हणजे डोंगर पोखरुन उंदिर काढल्यासारखी आहे. शेतकरी ३१ मार्चपर्यंत कर्ज फेडत असतो. मात्र सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय होईल. तसेच सात बारा कोरा करण्याची घोषणा केली होती. ती कुठे गेली? ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी नसून बॅंकांच्या फायद्यासाठी केली आहे.
- सदाभाऊ खोत, आमदार, माजी कृषी राज्यमंत्री

हेही वाचा - तरुणीला पळवून नेणाऱ्या रोडरोमिओची धुलाई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leader of Farmers Union Says On Announcement Of Loan Waiver Scheme