शिखरजी यात्रेहून आलेल्या भाविकांनी घातला महाप्रसाद आणि गावात झाला भलताच गोंधळ.....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

महाप्रसादामुळे खवटकोप ठळक चर्चेत!
कोरोना बाधितांच्या संपर्कामुळे खळबळ : गाव झाले भयभीत

अथणी (बेळगाव) :  तालुक्यातील खवटकोप येथे शिखरजी यात्रेहून आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा कार्यक्रम घेतला होता. त्यातील काही यात्रेकरू कोरोना बाधित असल्याचे सिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच गाव भयभीत झाले असून धास्ती पसरली आहे. येथील पाच जणांना अन्यत्र क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे येथील महाप्रसाद ठळकपणे चर्चेत आला आहे.

कोरोनाचे लोन आता खेडोपाडी पोहोचले आहे. ते बेळगाव जिल्ह्याच्या उत्तर टोकाला असलेल्या अथणी तालुक्यातील अथणी-गोकाक मार्गापासून तीन किलो मीटरवरील कृष्णा काठावरच्या खवटकोप गावापर्यंत आले आहे. शिखरजी यात्रेकरूंनी दीडशे जणांचा महाप्रसादाचा कार्यक्रम घेतल्याने सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावाला वेढा पडला आहे.

हेही वाचा- ऑनड्युटी टिकटॉक व्हिडिओ बनवणे आले अंगलट...तासगाव आगाराच्या महिला निरीक्षकांना केले निलंबित -

सुशिक्षित, नोकरदारांचे व धनिक गाव म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कामुळे गावाला भीतीच्या छायेखाली पोहोचविले आहे. किती जणांचा कोरोना बाधितांशी संपर्क आला, त्याची चर्चा गावासह परिसरात सुरू आहे. शंकरट्टी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या गावात आरोग्य खात्याने आपली नजर ठेवली आहे. येत्या काही दिवसात कोरोनाबाबतचे येथील चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा- किती दुर्दैवी : मृत्यूनंतर अफवेमुळे शववाहिका मिळाली नाही...मग काय कचरा गाडीतूनच मृतदेह न्यावा लागला -

गावचे तिन्ही मार्ग केले बंद

कोरोनाच्या भीतीमुळे खवटकोप गावाकडे येणारे अथणी, शंकरट्टी व शेगुणशी हे तिन्ही मार्ग बंद केले आहेत. कृष्णा नदीवरील बोटीचा प्रवास बंद झाला आहे. त्यामुळे येथे सीलडाउन सदृश स्थिती आहे.

'खवटकोप येथील पाच जणांना अन्यत्र क्वारंटाइन केले आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी आरोग्य खात्याशी संपर्क साधावा.'
-डॉ. एम. एस. कोप्पद, तालुका आरोग्य अधिकारी, अथणी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown impact on athani village belgaum district