
सांगलीसह सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट्यांची अधिकृत संख्या 43 असल्याचे वन्यजीव संशोधन संस्था (डेहराडून) यांनी जाहीर केले आहे.
सांगली : सांगलीसह सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट्यांची अधिकृत संख्या 43 असल्याचे वन्यजीव संशोधन संस्था (डेहराडून) यांनी जाहीर केले आहे. त्यात 17 नर, तर 26 मादी आहेत. जंगलात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून आलेली ही माहिती आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणेनंतर प्रथमच शास्त्रीय पद्धतीने वन्यजीवांची गणना केली जात आहे. त्यात बिबट्यांची संख्या मोजली गेली असून आता वाघांची संख्या मोजली जाणार आहे.
याआधी मचाणावर बसून, काही मोजके कॅमेरा लावून गणना व्हायची. त्यात एकच बिबट्या दोन-तीन ठिकाणी आढळला, तर त्याचे वर्गीकरण केले गेले नव्हते. यावेळी शास्त्रोक्त पद्धतीने बिबट्याची शरीररचना, हालचाली याचे निरीक्षण करून वर्गीकरण केले गेले आहे. त्यामुळे 43 बिबट्यांचे अस्तित्व निश्चित झाले आहे. कॅमेऱ्यात न आलेली संख्या विचारात घेतली तर ही संख्या 55 इतकी असू शकेल.
वन्यजीव दिनाचे औचित्य
वन्यजीव म्हणजे वनात, जंगलात राहणारे जीव-प्राणी, वनस्पती, कीटक, पक्षी, वृक्ष आणि एकूणच सर्व जीवमात्र. त्याविषयी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 2013 च्या अधिवेशनात 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित झाला. कारण नामशेष होणाऱ्या वन्यजीव सृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा पहिल्यांदा 3 मार्च 1973 रोजी झाला आणि तो 180 देशांनी मान्य केला म्हणून या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
असे मोजले बिबटे
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे 667 ग्रेड
- चांदोलीत 324 तर कोयनेत 343 ग्रेड
- प्रत्येक ग्रेडमध्ये दिवसरात्र कॅमेरा ट्रॅपिंग
- बिबट्याची शरीररचना, हालचालीवरून वर्गीकरण
- सुमारे 20 टक्के कॅमेऱ्यासमोर आले नसावेत, असा अंदाज
- चुकलेले गृहीत धरले बिबट्यांची संख्या 50 ते 55
लवकरच वाघांची गणना
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची अधिकृत गणना आता केली जाणार आहे. त्यासाठी 15 मार्च ते 31 मे दरम्यान कॅमेऱ्यांचे जाळे विणले जाईल. याआधी सह्याद्रीत पाच वाघांचे अस्तित्व आढळले होते. ती संख्या वाढल्याची खात्री वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे. चांदोलीच्या जंगलात वाघ आहेत हेच जिल्ह्यासाठी भूषणावह असून त्यांची संख्या वाढावी यासाठी जंगल क्षेत्रातील मानवी अतिक्रमणे हटवणे, त्यांची अन्नसाखळी मजबूत करणे हे आव्हान असेल.
सांगलीची वनस्पती समृध्दी
- विविध वृक्ष संपदा-1715
- सपुष्प प्रजाती-1684
- अपुष्प प्रजाती -31
- द्विदल वनस्पती-1282
- एकदल वनस्पती-402
- वनस्पती कुटुंब संख्या-175
- वेली प्रजातींची संख्या-222
- झुडपे संख्या-206
- केवळ झाडे-362
- औषधी वनस्पती-600
- खाद्योपयोगी वनस्पती-130
सांगलीची वन्यजीव-वनस्पती समृध्दी
- पक्षी- 297
- फुलपाखरे-270
- कीटकवर्गीय-109
- सस्तन प्राणी-29
- बेडूक वर्गीय-14
- मासे- 30
- सरपटणाऱ्या प्रजाती-38
(आधार ः दोन वर्षांतील सर्व्हेतून पुढे आलेली प्रजातींची संख्या)
जिल्ह्यात 710 लोक जैवविविधता नोंद वह्या
जैव विविधता महामंडळाकडून प्रत्येक गावात लोक जैव विविधता नोंदवही प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तयार करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार जिल्ह्यातील 699 गावांनी आणि महापालिका एक, नगरपालिका सहा व नगरपंचायती चार अशा एकूण 710 नोंदवह्या जिल्ह्यात तयार झाल्या आहेत. त्या जैव विविधता महामंडळाकडे पाठवल्या आहेत. यातून प्रथमच जिल्ह्यातील गावनिहाय वन्य-जीव संपदेची माहिती नोंदीत झाली आहे. ही यादी यापुढे सतत अपडेट करतानाच दुर्मिळ होत असलेल्या जीवांचीही नोंद होणार आहे. त्यातून त्यांच्या संरक्षणाच्या प्रयत्नांना दिशाही मिळणार आहे.
अन्न साखळी भक्कम रहावी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट्यांच्या संख्येबाबत अधिकृत माहिती याआधी उपलब्ध नव्हती. पहिल्यांदाच ती शास्त्रोक्त पद्धतीने संकलित करण्यात आली. या बिबट्यांचा अधिवास सुरक्षित ठेवतानाच अन्न साखळी भक्कम रहावी, अन्नाच्या शोधात त्यांनी जंगलाबाहेर पडू नये, यासाठी प्रभावी योजना राबवल्या जात आहेत.
- महादेव मोहिते, विभागीय वनाधिकारी, सह्याद्री राखीव
प्राणी-वनस्पतीच्या तस्करी रोखण्याचे काम सर्वांचे
वन्यजीव रक्षणासाठी प्राण्यांचा अधिवास संरक्षित केला पाहिजे. तो वाढवला पाहिजे. हे लोकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी लोकजागृती व लोकशिक्षण करावे लागेल. जिल्ह्यातील वनसंपदेचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याची पुस्तिका प्रसिद्ध होईल. यानिमित्ताने प्रथमच जिल्ह्याच्या वनसंपदेचा माहिती साठा पुढे येत आहे. वन्यजीव व वृक्षसंपदेवरच आपले अस्तित्व अवलंबून आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि त्यादिशेने कृती केली पाहिजे. प्राणी-वनस्पतीच्या तस्करी रोखण्याचे काम सर्वांचे आहे.
- प्रमोद दाणके, विभागीय वनाधिकारी, सांगली
फुलांची झाडे वाढवणे गरजेचे
राज्य फुलपाखरू म्हणून ओळखले जाणारे राणी पाकोळी (ब्लू मॉरमॉन) आढळून सांगलीत आमराई उद्यानासह विविध ठिकाणी आढळले आहे. 120 ते 150 मि. मी. आकाराचे हे फुलपाखरू आपल्याकडे दिसते. अशा अनेक नामशेष होणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती जपण्यासाठी कीटकनाशकांचा वापर बंद करणे, शक्य तिथे फुलांची झाडे वाढवणे गरजेचे आहे. प्रत्येकाने त्यासाठी संकल्प केला पाहिजे.
- सर्वदमन कुलकर्णी, फुलपाखरू अभ्यासक
त्यांचाही जगण्याचा हक्क
शिराळा वाळवा तालुक्यात बिबट्यांचे हल्ले वाढले किंवा कृष्णा नदीत मगरींचे हल्ले वाढल्याने संतापाची भावना व्यक्त होत आहे. मात्र यामागची कारणे मात्र समजून घेतली जात नाहीत. जंगल-नद्यांमधील मानवी अतिक्रमणांमुळेच हे होतेय. त्यांचाही जगण्याचा हक्क आहे. सारी पृथ्वी फक्त माणसांचीच नाही, याचे भान आपल्याला येईल तो माणसांच्या अस्तित्वासाठीचा सुदिन.
- पापा पाटील, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते
मानवी हस्तक्षेप पर्यावरणाची हानी करीत आहे
आपल्या सभोवती दिसणारे प्राणी-वनस्पती याबद्दल आपल्याला आधी ममत्व वाटले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी वाढलेला मानवी हस्तक्षेप पर्यावरणाची अतोनात हानी करीत आहे. शासन यंत्रणांची जबाबदारी केवळ कायदे करण्यापुरती नाही. आणि केवळ कायदे झाल्याने वन्यजीवांचे अस्तित्व टिकेल या भ्रमात राहता कामा नये. पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय मागे ठेवणार आहोत याचा वेळ करण्याची ही वेळ आहे.
- किरण नाईक, कार्यकर्ते, ऍनिमल राहत
संपादन : युवराज यादव