बघा 55 लाखांचा शोध कसा

मार्तंड बुचुडे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

जामगाव येथून उद्योगपती धुरपते यांच्या मोटारीतून चोरांनी 55 लाख रुपये लांबविले होते. या प्रकरणी पोलिसांनी सुरवातीला धुरपते यांच्या मोटारीवरील चालक नरसाळे यास अटक केली होती.

पारनेर ः जामगाव येथील उद्योजक सुरेश धुरपते यांच्या मोटारीतील 55 लाख रुपये चोरीप्रकरणी पारनेर पोलिसांनी त्यांच्या चालकासह तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

दोन लाखांची रोकड जप्त 
चालक धनंजय ऊर्फ धोंडिभाऊ शिवाजी नरसाळे (वय 23, रा. गोरेगाव), दाऊद शमशुद्दीन शेख (वय 24, रा. कोरेगाव, ता. श्रीगोंदे) व नजीर शमशुद्दीन सय्यद (रा. पोखरी, ता. पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन वाहने, दोन लाख 15 हजार रुपयांची रोकड जप्त केली. या गुन्ह्यातील मोठी रक्कम व उर्वरित आरोपी पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. 

अवश्‍य वाचा पूर्वीच्या पायावरच आयुषची पायाभरणी 

आणखी तीन नावे निष्पन्न 
जामगाव येथून उद्योगपती धुरपते यांच्या मोटारीतून चोरांनी 55 लाख रुपये लांबविले होते. या प्रकरणी पोलिसांनी सुरवातीला धुरपते यांच्या मोटारीवरील चालक नरसाळे यास अटक केली होती. त्यानंतर शेख व सय्यद यांना पोलिसांनी अटक केली. चोरांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार (एमएच 12 एचव्ही 6607) व तीन मोबाईल ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

अवश्‍य वाचा बाजार समितीला "दादा पाटलां'चे नाव

गुन्ह्याची उकल होणार 
उद्योजक धुरपते यांच्या मोटारीचा चालक ताब्यात घेतल्याने आता गुन्ह्याची उकल होण्याची शक्‍यता आहे. आरोपींनी कट करून गुन्हा नेमका कशासाठी केला? त्यांच्या कटात आणखी कोणी सहभागी होते का? याचा पोलिस शोध घेत आहेत. 

गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. लवकरच सर्व आरोपी व रक्कमही मिळेल. 
- राजेश गवळी, सहायक पोलिस निरीक्षक 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Look at how to find 55 lakhs