आज रात्री बघा छायाकल्प चंद्र ग्रहण

 Lunar eclipse
Lunar eclipse


नवीन वर्षातील पहिले चंद्र ग्रहण उद्या (ता. 10) पौष पौर्णिमेच्या दिवशी घडणार आहे. हे ग्रहण छायाकल्प प्रकारचे असल्याने ते प्रेक्षणीय असणार नाही. रात्री 10.37 ला (स्पर्श) सुरू होणारे हे ग्रहण मध्यरात्रीनंतर 2.42 ला (मोक्ष) संपेल. ग्रहणमध्य रात्री 12.40 असेल. जिज्ञासूंनी ते जरूर पहावे.

हे पण वाचा -  कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; आता अशी मिळणार विमानसेवा

खग्रास किंवा खंडग्रास ग्रहणाप्रमाणे छायाकल्प प्रकारात चंद्रबिंब लाल किंवा काळे पडलेले दिसत नसल्याने या ग्रहणाची फारशी कोणी दखल घेताना दिसत नाहीत. यावर्षी दोन सूर्य व चार चंद्र अशी एकूण सहा ग्रहणे घडणार आहेत. यापैकी चारही चंद्रग्रहणे छायाकल्प प्रकारची असतील. या नंतर पुन्हा पाच जून, पाच जुलै व 30 नोव्हेंबरला अशीच ग्रहणे दिसतील.

हे ग्रहण विनासाधन थेट डोळ्यांनी कोणतीही भीती न बाळगता पाहता येईल. याबाबतच्या सर्व समजुती कालबाह्य आणि टाकावू आहेत. हे आजच्यासह वर्षातील चारही छायाकल्प चंद्र ग्रहणांतून सिद्ध होणार आहे. कारण ही ग्रहणे घडून जातील पण कोणीही त्यांची दखल घेणार नाही.

हे पण वाचा - सांगली महापालिकेचा डॉमिनोझ्‌ पिझ्झाला दणका... 

सूर्य प्रकाशामुळे अंतराळात पृथ्वीच्या नेहमीच दोन सावल्या पडलेल्या असतात. दाट सावली Umbra व विरळ सावली Penumbra. पौर्णिमेला जर सूर्य-पृथ्वी-चंद्र हे तीनही पिंड एका सरळ रेषेत आले तर चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत सापडतो आणि खग्रास चंद्र ग्रहण घडते. कधी तो सरळ रेषेच्या थोडा वर किंवा खाली राहतो त्यामुळे त्याचा काही भाग दाट सावलीतून तर, काही भाग विरळ सावलीतून जातो. अशा वेळी खंडग्रास चंद्र ग्रहण होते. मात्र काही वेळा पूर्ण चंद्रबिंब हे विरळ सावलीतून penumbra जाते. अशा वेळी सूर्याच्या एका बाजूने येणारा प्रकाश अडवल्याने चंद्रावर पृथ्वीची सावली पडलेली असते आणि सूर्याच्या दुसऱ्या बाजूने मात्र चंद्रावर प्रकाश पडलेला असतो. म्हणजे आपण एकाच वेळी पृथ्वीच्या सावलीने ग्रासलेला आणि सूर्य प्रकाशाने उजळलेला चंद्र पहात असतो. त्याचे तेज नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे न दिसता थोडे झाकोळलेले असते पण आपल्या डोळ्यांना हा तेजातील फरक जाणवत नाही. त्यामुळे ग्रहण लागले आहे याची आपल्याला कल्पनाच येत नाही. पृथ्वीची सावली आणि सूर्याचा प्रकाश (छाया + प्रकाश) अशी अवस्था म्हणजे छायाकल्प चंद्र ग्रहण.

हे पण वाचा -  गुड न्यूज...  `या` बॅंकेच्या लिलावास स्थगिती...

हे ग्रहण यूरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका तसेच दक्षिणोत्तर अमेरिकेच्या काही भागातून जवळपास अर्ध्या अधीक पृथ्वीतलावरून दिसेल. रात्री 10.37 ला चंद्र विरळ सावलीमध्ये प्रवेश करेल. त्याचे तेज नकळत थोडे कमी होईल मात्र तो नेहमी सारखाच प्रकाशित दिसेल. रात्री 2.42 नंतर ग्रहण सुटेल आणि चंद्राचे तेज पुन्हा पूर्ववत होईल.  

शंकर शेलार, खगोल अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com