esakal | मंत्री महाेदय जाताच त्यांनी खाटा केल्या रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री महाेदय जाताच त्यांनी खाटा केल्या रवाना

डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, रुग्णालयातील बंद असलेले विविध विभाग आदी गैरसोयीवर दै. "सकाळ'ने बातम्यांद्वारे प्रकाश टाकून आवाज उठवला. त्यातून तेथील अनेक प्रश्न मार्गीही लागले. मात्र, खाटांचा प्रश्न अद्यापही तसाच लोंबकळत पडला आहे.

मंत्री महाेदय जाताच त्यांनी खाटा केल्या रवाना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि. सातारा)  : येथील ग्रामीण रुग्णालयातील विविध असुविधांचे प्रश्न मार्गी लागत असताना खाटांचा प्रश्न मात्र 14 वर्षांपासून तसाच लोंबकळत पडला आहे. 30 खाटांच्या रुग्णालयात सध्या दहाच खाटा उपलब्ध असल्याने अनेकदा वाढलेल्या रुग्णांना जमिनीवर गाद्या टाकून झोपवावे लागत आहे. खाटा नसल्याने रुग्णालयातील वॉर्डही मोकळेच पडलेले दिसत आहेत.
 
विभागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, म्हणून 14 वर्षांपूर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करून ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. मात्र, "एक ना धड, भाराभर चिंध्या' अशीच काहीशी या रुग्णालयाची सुरुवातीपासूनची अवस्था आहे. सुरुवातीला प्राथमिक शाळेच्या पत्र्याच्या शेडवजा खोल्यात रुग्णालयाचे कामकाज सुरू होते. त्यानंतर नव्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले. अनेक वर्षे रखडलेले इमारतीचे बांधकाम 2015 मध्ये पूर्ण झाल्यानंतर तेथे रुग्णालयाचे स्थलांतर झाले असले, तरी समस्यांनी त्याची पाठ सोडलेली नाही. रुग्णालयात उपचारासाठी येणारा रुग्ण समाधानी चेहऱ्याने बाहेर पडलाय, असे सहसा बघायला मिळत नाही. डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, रुग्णालयातील बंद असलेले विविध विभाग आदी गैरसोयीवर दै. "सकाळ'ने बातम्यांद्वारे प्रकाश टाकून आवाज उठवला. त्यातून तेथील अनेक प्रश्न मार्गीही लागले. मात्र, खाटांचा प्रश्न अद्यापही तसाच लोंबकळत पडला आहे. तीस खाटांच्या रुग्णालयात सुरवातीपासून पाचच खाटा होत्या. मध्यंतरी रुग्ण कल्याण निधीतून आणखी पाच खाटा खरेदी करण्यात आल्या, तरीही 20 खाटा अजूनही कमीच आहेत. दररोज सरासरी शंभर आणि मंगळवारी अडीचशे रुग्ण येथे उपचारासाठी येतात. दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांची येथेच ऍडमिट होऊन उपचार घेण्याची इच्छा असते. मात्र, अनेकदा दहाही खाटा फुल्ल असल्यावर त्यांच्यापुढेही रुग्णालयात हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय उरत नाही. अनेकदा वाढलेल्या रुग्णांना जमिनीवर गाद्या टाकून झोपवावे लागत आहे. खाटा नसल्याने रुग्णालयातील वॉर्डही मोकळेच पडलेले आहेत. 

मंत्र्यांपुढे केला खाटांचा फार्स अन्‌... 

मध्यंतरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन मंत्र्यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी आरोग्य विभागाचे दैन्य मंत्र्यांच्या नजरेला पडू नये, यासाठी येथील रुग्णालयाच्या प्रशासनाने भलताच फार्स केला. त्यांनी आजूबाजूच्या गावातील शासकीय रुग्णालयातून खाटा गोळा करून आणल्या आणि येथील रुग्णालयातील वॉर्ड खाटांनी गच्च भरून टाकले. कार्यक्रमात मंत्र्यांनी रुग्णालयातील व्यवस्थेचे तोंड भरून कौतूकही केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी या आणलेल्या खाटा टेंपोतून त्या- त्या ठिकाणी रवाना केल्याने पुन्हा हा वॉर्ड मोकळा पडला, आजतागायत तो तसाच आहे.

अवश्य वाचा : उंडाळेच्या विद्यार्थ्यांनी दोन लाख परत केले

हेही वाचा : सातारकर संतप्त मुलींनी युवकाला चोपले

वाचा कराडच्या व्यावसायिकास 'या' दादाने मागितली खंडणी

हेही वाचा : हवालदाराची पोलिस अधीक्षकांवरच कारवाई