सातारकर संतप्त मुलींनी युवकाला चोपले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

संशयित युवकाने आक्षेपार्ह कृत्य केल्यामुळे मुली संतप्त झाल्या व त्यांनी त्या युवकाला चोपले. या प्रकाराची सातारा शहरात चांगलीच चर्चा रंगली होती. 
 

सातारा : रस्त्यावरून जाणाऱ्या महाविद्यालयीन मुलींची युवकाने छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलींनी घाबरून न जाता धाडसाने पुढे येत संबंधित युवकाला चांगलाच चोप दिला. या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
 
याबाबतची अधिक माहिती अशी, की मंगळवारी (ता. 11) सायंकाळी सातारा परिसरातील एका कॉलेजमधील काही मुली चालत निघाल्या होत्या. त्या वेळी एक युवक त्यांचा पाठलाग करत होता. काही मुलींना त्याची शंकाही आली. पाठलाग होत असल्याचे पाहून मुली घाबरल्या. मात्र, काही वेळाने मुलींनी घाबरून न जाता पाठलाग करणाऱ्या मुलास सामोरे जात त्याचा प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला. पाठलाग करणाऱ्या युवकाला त्यांनी थेट विचारणाच केली. या वेळी संशयित युवकाने आक्षेपार्ह कृत्य केल्यामुळे मुली संतप्त झाल्या व त्यांनी त्या युवकाला चोपले. या प्रकाराची रात्री उशिरापर्यंत सातारा शहरात चर्चा होती. 

वाचा : धक्कादायक : केंब्रीजचे विद्यार्थी शाळेतून पळाले; शिक्षकांचा त्रासाचा पोलिसांत दावा

शिरवळमध्ये चोरीचे मोबाईल विकणारे दोघे ताब्यात 

सातारा : चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिरवळ येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे एक लाख तीन हजार रुपये किमतीचे अकरा मोबाईल, एलसीडी टीव्ही असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनिल अंकुश काळे (वय 19, सध्या रा. शिवाजी चौक, वीटभट्टी खंडाळा, मूळचा देशमुखचारी, शिर्डी, जि. नगर), दीपक ऊर्फ राजकुमार रामतिरत गौतम (वय 20, रा. इंदापूर, जि. पुणे, मूळगाव गोरखपूर, उत्तर प्रदेश) अशी संबंधित संशयितांची नावे आहेत. अधिक तपासासाठी त्यांना शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दोन व्यक्ती शिरवळ बस स्थानक परिसरात पांढऱ्या रंगाच्या झेन कार (एमएच 12 एएफ 3670) मधून चोरीचे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी पथकासह सापळा रचून संबंधित दोन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले. अनिल काळे, दीपक गौतम यांची अधिक तपासणी केली असता त्यांच्याकडे चोरीचे 11 मोबाईल, एक एलसीडी टीव्ही असा एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला, तर त्यांच्या आणखी दोन साथीदारांनी शिंदेवाडी (शिरवळ) हद्दीत हॉटेल मांडवली येथे एकास कुऱ्हाडीने मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल चोरून नेल्याचे सांगितले. या प्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात संबंधित चोरट्यांविरोधात जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते. अधिक तपासासाठी संशयित दोन चोरट्यांना शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतिराम बर्गे, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, वैभव सावंत, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन यांनी सहभाग घेतला. 

जरुर वाचा : हवालदाराची पोलिस अधीक्षकांवरच कारवाई

हेही वाचा : सज्जनगडावर आता रोप वे ?

हेही वाचा : दारुड्या मुलाचा बापाने केला खून

वाचा : हॉटेल व्यावसायिकास 'या' दादाने मागितली खंडणी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girls Beats Boy For Molestation Satara News