खासगी ट्रॅव्हल्स बसमधून शेतमाल वाहतुकीला ब्रेक ! 

खासगी ट्रॅव्हल्स बसमधून शेतमाल वाहतुकीला ब्रेक ! 

सोलापूर ः राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई, पुण्यासह सर्व राज्यभरात प्रवाशांबरोबर काही प्रमाणात सर्व प्रकारचा माल घेऊन धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसच्या वाहतुकीला महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने ब्रेक लावला आहे.

रविवारपासून अंमलबजावणी 

रविवारपासून (ता. 15) त्यासाठी विशेष कारवाईची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. आदेश डावलणाऱ्या वाहनचालकाचा परवाना निलंबित करण्यासह 15 हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका मुंबई, पुण्याकडे शेतमाल पाठवणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना बसणार आहे. 

म्हणून घ्यावा लागतो ट्रॅव्हल्सचा आधार 
ज्यांच्याकडे कमी म्हणजे 10-20 बॉक्‍स किंवा पोती असा शेतमाल निघतो, त्यांना तरकारी गाड्या किंवा त्यांचे भाडे परवडत नाही, ते त्यांच्या आवाक्‍याबाहेर असते. त्यामुळे हे छोटे शेतकरी प्रामुख्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या या खासगी ट्रॅव्हल बसचा आधार घेतात. या बसच्या पाठीमागे किंवा डाव्या बाजूला असणाऱ्या लगेजच्या (सामानकक्ष) जागेत हे बॉक्‍स भरून ते मुंबई, पुण्याकडे पाठवतात. 

शेतीमालासह सर्व मालवाहतुकीला बंदी 
परिवहन विभागाच्या या एका निर्णयाने आता या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. अर्थात, केवळ शेतमालच नव्हे, तर पार्सलच्या नावाखाली अन्य सर्व प्रकारच्या मालवाहतुकीला आरटीओंकडून बंदी घालण्यात आली आहे. विशेषतः नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड, नाशिक, औरंगाबाद या भागातील शेकडो बस प्रामुख्याने या मार्गावर धावतात. तसेच काही गाड्या शेजारच्या राज्यातील तेलंगणातील हैदराबाद, कर्नाटकातील विजयपूरकडेही धावतात. शेतमालाला सूट द्यावी, अशी मागणी होत आहे. 
 

हेही आवर्जून वाचा.... एकीचे बळ 

तरकारी गाडी परवडत नाही 
माझ्याकडे सध्या रंगीत ढोबळी मिरचीचे उत्पादन सुरू आहे. दिवसाआड 20 ते 30 बॉक्‍स निघतात. पण बॉक्‍स कमी असल्याने तरकारी गाड्यामध्ये पाठवणे परवडत नाही, ते बसमधून पाठवतो. आता बसवाल्यांनी रविवारपासून माल नेणार नाही, असं सांगितलं आहे. 
-धनंजय हजारे, शेतकरी, मंगळवेढा 

आमच्यासमोर पर्याय नाही 
वाशी मार्केटमध्ये आरटीओंनी दोनच दिवसांपूर्वी आमच्या गाड्या तपासल्या. यापुढे शेतमाल वाहतूक करायचा नाही, अशी ताकीद दिली आहे. रविवारपासून कारवाई केली जाणार आहे. आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही. 
-सतीश नागणे, मालक, खासगी ट्रॅव्हल कंपनी

नियमानुसार कारवाई करणार 
खासगी ट्रॅव्हल बसमधील मालवाहतुकीवर कारवाईची मोहीम कायमच सुरू असते, 15 डिसेंबरपासून विशेष मोहीम घेणार आहोत. केवळ शेतमालच नव्हे, तर सर्वप्रकारच्या मालवाहतुकीचा त्यात समावेश आहे. नियमानुसार आम्हाला ही कारवाई करावी लागणार आहे. 
-संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण (मुंबई) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com