काळूबाईकडे निघालात...मग हे वाचाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

मांढरदेव यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाईतून प्रत्येक 15 मिनिटाला मांढरदेव गडावर जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे भाविकांनी अवैध वाहनांतून प्रवास टाळावा तसेच प्राण्यांची वाहतूक करू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी केले आहे.

सातारा : मांढरदेव यात्रा अपघातमुक्त करण्याबरोबरच अवैध प्रवासी व प्राणी वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी उपप्रदेशिक परिवहन विभाग सज्ज झाला असून, वाहनांच्या तपासणीसाठी सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.  याबराेबरच प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदारीनुसार कामाची जबाबदारी उचलली आहे.

नक्की वाचा - Video : येथे आजही अंधश्रध्‍देचा कहरच...

मांढरदेव येथील काळूबाईच्या यात्रेला आजपासून (ता. नऊ) सुरवात होत आहे. 2005 च्या मांढरदेव दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था राखली जावी, कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदारीनुसार कामाची जबाबदारी उचलली आहे. त्यात उपप्रादेशिक परिवहन विभागही सज्ज झाला आहे. यात्रेच्या कालावधीमध्ये राज्यातील विविध विभागांतून तसेच परराज्यांतूनही भाविक मोठ्या प्रमाणावर मांढरदेव गडावर येतात. या काळात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. मांढरेदव गडावरील अंधश्रध्दांमुळे या कालावधीत मांढरदेव गड व वाई परिसरातील काही ठिकाणी जनावरांच्या कत्तलीही केल्या जातात. त्यामुळे जनावरांची अवैध वाहतूक होत असते. या गोष्टी विचारात घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाने सहा पथकांची स्थापना केली आहे.

हेही वाचा -  ई-सकाळच्या ट्विटची रेल्वे प्रशासनाकडून दखल

मांढरदेव दुर्घटनेनंतर नेमण्यात आलेल्या कोचर आयोगानेही यात्रा कालावधीत कोणत्या विभागाने काय काळजी घ्यायची, याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ही पथके कार्य करणार आहेत.
 
सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मदतीसाठी या पथकामध्ये कोल्हापूर व पुणे येथील वायुवेग पथकांचा समावेश करण्यात आला आहे. तीन पथकांमधील एक पथक हे मांढरदेव येथील वाहन तळावर नियुक्त असणार आहे.

दुसरे पथक हे वाई औद्योगिक वसाहतीमध्ये तर तिसरे पथक गडाच्या भोर (जि. पुणे) बाजूला असणार आहे. वाई औद्योगिक वसाहत व भोर बाजूला असणारी पथके ही भोर ते मांढरदेव तसेच मांढरदेव-वाई-सुरूर-पाचवड या मार्गावर सतत गस्तीवर असणार आहेत.

हेही वाचा - साताऱ्यात रंगणार सकाळ स्कूल क्रिकेट लीग

पहिली तीन पथके ही सकाळी आठ ते रात्री आठ आणि दुसरी तीन पथके ही रात्री आठ ते सकाळी आठ या कालावधीत कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे या परिसरातील नऊ ते 11 जानेवारी या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे 24 तास लक्ष असणार आहे.

मालवाहू वाहनांतून होणारी प्रवासी वाहतूक व जनावरांची वाहतूक रोखणे, यात्रा काळातील गर्दीचा अंदाज घेऊन गडाच्या वाई व भोर पायथ्यापासून वाहनांचा प्रवाह नियंत्रित करणे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची असुविधा निर्माण झाल्यास नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून अडचण सोडविण्याचे काम ही पथके करणार आहेत. 

 वाचा : राजे ठाकरेंच्या भेटीची चर्चा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandhardev Fair Starts From Today At MandharGad