Video : काळूबाईच्या नावानं चांगभलंने दुमदुमला मांढरगड

भद्रेश भाटे
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

शाकंभरी पौर्णिमेला भरणा-या मांढरदेवी यात्रेचा हा आजचा महत्वाचा दिवस मानला जातो. सन 2005 मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर या गडावरील संपूर्ण यात्रा ही शासकीय यंत्रणेकडून पार पाडली जाते.

मांढरगड (ता. वाई) : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरगडावरील काळूबाईची यात्रा आज (शुक्रवार) संपन्न होत आहे. या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील मोठ्या प्रमाणात भाविक येऊ लागले आहेत.

मांढरदेव (ता. वाई) येथील काळेश्वरी देवीच्या यात्रेस आजपासून प्रारंभ झाला. यात्रेसाठी मांढरगडावर भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. यात्रेच्या अनुषंगाने गडावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 

प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे आदींनी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. गुरुवारी (ता.9) रात्री देवीचा जागर झाला. या जागराला देवीची मानाची पालखी गावातून वाजत- गाजत मंदिराकडे आणण्यात आली. 

पहाटे सहा वाजता देवीची मान्यवरांच्या हस्ते मुख्य पूजा बांधण्यात आली. यात्रेनिमित्ताने येणाऱ्या भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी देवस्थान ट्रस्टने मुख, कळस व चरण दर्शन, तसेच देव्हारे व छबिना यासाठी बॅरिकेडच्या माध्यमातून स्वतंत्र रांगांची सोय केली आहे.

हेही वाचा - शिक्षक कंटाळले गटबाजीला ; लढाई सुरुच ठेवणार

मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली असून, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर परिसरात प्रसाद, हार, नारळ, ओटी, हळदी-कुंकू, खेळणी, उबदार कपडे, उपहारगृह, देवीची महिमा सांगणाऱ्या कॅसेट, फोटो आदींची दुकाने थाटली आहेत.

गडावर येणारी खासगी वाहने व एसटी बस यांच्यासाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात महाद्वार, पार्किंग या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे यात्रेतील हालचालींवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
 
यात्राकाळात मांढरदेव परिसरातील वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी वीज वितरण कंपनीमार्फत 40 कर्मचारी व तीन पथकांमध्ये कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीमार्फत भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी करून देण्यासाठी, तसेच आरोग्याच्या दृष्टीने परिसरात स्वच्छता राहण्यासाठी जंतुनाशक फवारणी, तसेच शौचालये उभारली आहेत.

हेही वाचा -  पाटण (जि.सातारा) : बिबट्या पून्हा आला... अन्

मांढरदेव घाट रस्त्यात अपघात होऊ नयेत, यासाठी परिवहन विभागाची आठ पथके तयार करण्यात आली आहेत. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी व भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याच्या नियोजनासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, यात्रा समिती, तसेच प्रशासनाच्या विविध विभागांचे कर्मचारी यांनी गडावर तळ ठोकला आहे. 

जरुर वाचा -  काळूबाईकडे निघालात...मग हे वाचाच

विविध पथकांची नजर 

यात्राकाळात पशुहत्या, दीपमाळेत तेल टाकणे, तसेच झाडांवर लिंबू खिळे ठोकून केल्या जाणाऱ्या जादूटोणा प्रकारांना आळा घालण्यासाठी कर्मचाऱ्यांची विविध पथके लक्ष ठेवून आहेत. यात्रेच्या अनुषंगाने पशुसंवर्धन व पोलिस विभागाची पथके वाहनांची तपासणी करीत आहेत. पशू व कोंबड्या यात्रेच्या ठिकाणी जाऊ नयेत, याची काळजी घेतली जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandhardevi Fair Begins Today Satara News