महिला बचत गटांचे मास्क तयार परंतु...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

शहरात सुमारे शंभर बचतगट आहेत. बचत गटांकडून जादा उत्पादन करणे शक्‍य आहे. त्यामुळे दानशुरांनी योजनेस हातभार लावावा, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

कऱ्हाड ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील पालिकेच्या पाच महिला बचत गटांनी मास्कचे उत्पादन सुरू केले आहे. त्यांचे मास्क स्वयंसेवी संस्थांनी खरेदी करावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे. मास्क, व्हेंटिलेटर, सॅनिटायझर निर्मितीला सर्वच स्तरावर प्राधान्य दिले जात आहे. त्यात आता शहरातील बचत गटांनीही मास्कच्या निर्मितीला प्राधान्य दिल्याने कौतुक होत आहे.
 
महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी तीन वर्षांत सभापती म्हणून काम करताना विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत, तर सध्या कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनच्या काळात बचत गटांना उद्योगाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी पालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पाच बचत गटांनी प्राथमिक स्तरावर मास्कचे उत्पादन सुरू केले आहे.

बचत गटांनी मास्क उत्पादित करावेत, यासाठी सभापती हुलवान व गणेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार रिद्धी, मैत्री, प्रज्ञा, हरिओम व विघ्नहर्ता महिला बचत गटांनी मास्कचे उत्पादन सुरू केले आहे. सद्यःस्थितीत सुमारे दीड हजार मास्क तयार केले आहेत; पण बचत गटांसमोर त्याच्या मार्केटिंगची समस्या आहे. गोरगरीब व उपेक्षित लोकांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे. त्यामुळे मदत कार्यातील स्वयंसेवी संस्थांसह लोकप्रतिनिधींनी सहकार्य करत बचत गटांकडून मास्क माफक दरात खरेदी करावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे. 

शासकीय कार्यालयात चाेरी; लाखाे रुपयांच्या दारुच्या बाटल्या पळविल्या 

शहरात सुमारे शंभर बचतगट आहेत. बचत गटांकडून जादा उत्पादन करणे शक्‍य आहे. त्यामुळे दानशुरांनी योजनेस हातभार लावावा, असे आवाहन सभापती हुलवान व पालिकेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक गणेश जाधव यांनी केले आहे. 

डॉ. हमीद दाभोलकरांनी या साठी घेतलाय पुढाकार

पालिकेच्या पाच बचत गटांनी अत्यंत चांगले मास्क तयार केले आहेत. त्या मास्कच्या खरेदीसाठी शहरात गोरगरिबांना मदत करणाऱ्या संस्थांनी पुढे यावे. त्या संस्थांनी बचत गटांचे मास्क खरेदी करून मदतकार्यात हातभार लावावा. त्यामुळे बचत गटांच्या कामाला चालना मिळणार आहे. 
 स्मिता हुलवान, सभापती, महिला व बालकल्याण समिती. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manufacturing Of Masks Started By Women Self Groups In Karad