esakal | मराठा सेवा नागरी पतसंस्थेचे कामकाज ठप्प!
sakal

बोलून बातमी शोधा

maratha Co-operative Credit Societys work stopped

संस्थेचे संचालक मंडळ अल्पमतात आल्याने जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी संस्थेवर नगर तालुका उपनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी (श्रेणी-1) पौर्णिमा सुर्वे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.

मराठा सेवा नागरी पतसंस्थेचे कामकाज ठप्प!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक होऊन तब्बल तीन आठवडे उलटले, तरीही संस्थेचे कामकाज ठप्पच आहे. प्रशासकांना रीतसर पदभार न देताच सरव्यवस्थापक "आजारी' पडले आहेत. रुग्णालयात "दाखल' असतानाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखीने करण्याचा आदेश त्यांनी "जारी' केला. विशेष म्हणजे त्याची संबंधितांनी नियमबाह्यपणे अंमलबजावणीही केली.

अधिक वाचा-  शिवथाळीला मिळाला अखेर "हा' मुहूर्त

संस्थेचे संचालक मंडळ अल्पमतात आल्याने जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी संस्थेवर नगर तालुका उपनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी (श्रेणी-1) पौर्णिमा सुर्वे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. सुर्वे पदभार घेण्यासाठी संस्थेत गेल्या असता, त्यांना तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सुर्वे यांनी एकतर्फी पदभार घेतला. तेव्हापासून सरव्यवस्थापक प्रशासकांना कोणतीही माहिती न देता गायब झाले.

ठेवीदारांमध्ये असुरक्षिततेचे व संभ्रमाचे वातावरण

कर्मचाऱ्यांनीही प्रशासकांसोबत असहकाराची भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासकांना प्रभावीपणे काम करता येत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर संस्थेचे कामकाज मात्र पूर्णपणे ठप्प असून, त्यामुळे सभासद व ठेवीदारांमध्ये असुरक्षिततेचे व संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. या सर्व बाबींचा संस्थेवर अनिष्ट परिणाम होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

सरव्यवस्थापक आजारी

एकतर्फी पदभार घेतल्यानंतर प्रशासक सुर्वे यांनी सहकार कायदा 1960च्या कलम 80 मधील तरतुदीनुसार पोलिस बंदोबस्तात कामकाज करण्याबाबतचा अहवाल जिल्हा सहकारी उपनिबंधकांना सादर केला. तथापि, सरकारच्या कर्जमाफी निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर अचानक वाढलेले कामकाज व अन्य बाबींमुळे प्रशासक सुर्वे यांना संस्थेच्या कामकाजावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येत नाही. सरव्यवस्थापक आजारी पडले असून, कर्मचारी सहकार्य न करता रजेवर जाण्याची भाषा करीत आहेत.

उघडून तर बघा-  मायेचे तोडून सर्व पाश, "ती'ने धरला तरुणाचा हात 

प्रशासक नेमण्याच्या आदेशाविरुद्ध अपील

संस्थेचा कारभारच ठप्प झाल्याने संस्थेचे माजी संचालक यशवंत (बापू) ओवाळ, ठेवीदार विजय कोठारी व सुमन गुंजाळ, सभासद सुरेश कर्पे व विजय म्हस्के यांनी आज जिल्हा सहकारी उपनिबंधकांसमोर संस्थेच्या कारभाराच्या सद्यःस्थितीची कैफियत मांडून, याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. दरम्यान, संस्थेवर प्रशासक नेमण्याच्या जिल्हा सहकारी उपनिबंधकांच्या आदेशाविरुद्ध नाशिक विभागाच्या सहनिबंधकांकडे अपील करण्यात आले असून, त्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. 

संस्थेची आर्थिक स्थिती चांगली

संस्थेचे कामकाज ठप्प झाल्याबाबत सभासद व ठेवीदारांची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी पावले उचलण्यात येतील. संस्थेची आर्थिक स्थिती चांगली असून, सभासद व ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. 
दिग्विजय आहेर, जिल्हा सहकारी उपनिबंधक 

अस्तित्वात नसलेल्या अध्यक्षांकडे रजेचा अर्ज! 

संस्था अल्पमतात आल्याने जिल्हा उपनिबंधकांनी त्यावर प्रशासकाची नेमणूक केली. त्या संदर्भातील त्यांचा आदेश आजही कायम आहे. असे असताना संस्थेच्या सरव्यवस्थापकांनी मात्र आजारपणाच्या रजेचा अर्ज प्रशासकांना सादर करण्याऐवजी तो संस्थेच्या अध्यक्षांकडे पाठविला आहे. त्याची प्रत जिल्हा सहकारी उपनिबंधकांना पाठविल्याने सहकारातील कारभाराचा हा "अजब' नमुना आज चव्हाट्यावर आला.