मटका बुकी पेटवण्यापर्यंत संघर्ष 

मटका बुकी पेटवण्यापर्यंत संघर्ष 

कोल्हापूर - हद्दीचा वाद आणि स्पर्धेतून थेट मटक्‍याच्या टपऱ्या पेटवून देण्यापर्यंतचा संघर्ष मटकामालकांच्यात सुरू झाला आहे. याची झलक महिन्याभरापूर्वी शिंगणापूर परिसरातील खांडसरी येथे साऱ्यांनी अनुभवली, मात्र असे काही घडलेच नाही, हे पद्धतशीरपणे भासवून संबंधित यंत्रणा नामानिराळी राहिली. मटका व्यावसायिकांतील एकमेकांना उद्‌ध्वस्त करण्याची ईर्ष्या वाढू लागली. यातूनच स्पर्धकाविरोधातील ‘टीप’ देण्याचे प्रकार वाढू लागलेत. अनेक ठिकाणी फाळकूटदादांचा आधार घेऊन दहशत निर्माण करण्याचे प्रकार जोर धरू लागले आहेत. 

मटका व्यवसायाचे जाळे दूरपर्यंत पसरविण्यासाठी मालक वर्गांच्यात स्पर्धा आहे. हद्दीचा वादही निर्माण होत आहे. याच वादातून महिन्याभरापूर्वी शिंगणापूर फाट्याजवळील खांडसरी परिसरातील मटक्‍याच्या टपऱ्या पेटविल्या. हा प्रकार एक विशिष्ट यंत्रणा सोडून इतर सर्वांनी पाहिला; मात्र दहशतीमुळे सामान्यांची तक्रार देण्याची हिम्मत झाली नाही. यंत्रणेकडून आग लागून टपरी पेटली, ती विझवली, असे सांगण्यात आले. स्पर्धेत टिकायचे असेल, तर प्रतिस्पर्ध्याला अडकवायचे, ही नीती अवलंबण्यात येत आहे. विरोधकाची ‘टीप’ यंत्रणेला देऊन त्याला रेकॉर्डवर आणायचे. त्याला उद्‌ध्वस्त करायचे, जादा वाटा देण्यास भाग पाडायचे हा प्रयत्न सुरू आहे. याचा फायदा विशिष्ट यंत्रणेलाच होतो. काही व्यावसायिकांनी १० ते १५ हजार रुपये मासिक पगारावर एजंट ठेवले आहेत. विशिष्ट यंत्रणेच्या ससेमिरा, कारवाई झाली तर ती अंगावर घ्यायची, मात्र मूळ मालकाला त्यापासून कोसोदूर ठेवण्याची जबाबदारी हे एजंट पेलत आहेत. 

आलिशान मोटार, उंची कपडे, गळ्यात, हातात सोन्याचे दागिने, किमती मोबाईल संच, अशा रुबाबात वावरणाऱ्या मटका व्यावसायिकाला पाहून भल्याभल्यांचे डोळे फिरतात. त्याला तरुणाईही अपवाद नाही. ‘इजी मनी’साठी ते त्या व्यवसायाकडे आकर्षिले जात आहेत. सळसळत्या रक्ताचा व्यावसायिक प्रोटेक्‍शनसाठी वापर करून लागलेत. बघता बघता काल परवाची पोरं दादा म्हणून वावरू लागली आहेत. व्यवसायामुळे त्याचा यंत्रणेशी वारंवार संपर्क येतो. त्याच्याच आधारे भागातील दोन-चार प्रकरणे मिटविण्यातही पुढे येऊ लागलीत. त्यांचे भागात रात्री धूमधडाक्‍यात वाढदिवसही साजरे होत आहेत. अशा फाळकूटदादांच्यात संघर्षाच्या ठिगण्याही पडू लागल्या आहेत. 
 
मांडवलीतून  हद्दीची निश्‍चिती
काही मटका मालकांनी मांडवली करून हद्द निश्‍चित केली. राजारामपुरी, शाहूपुरीत दोन, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, लक्ष्मीपुरीत एक, तर करवीरमध्ये पाच जणांची हद्द निश्‍चित झाली. हद्दीनुसार ‘लाख’मोलाचा वाटाही यंत्रणेने निश्‍चित केला. राजारामपुरीतील दोन मालकांना १२, शाहूपुरी हद्दीवाल्याकडून ६, लक्ष्मीपुरी ५, राजवाडा ७, करवीर हद्दीतील चौघा मालकांकडून २०, तर जिल्ह्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेला ‘लाख’मोलाचे वाटे द्यावे लागतात, अशी ओरड दोन नंबरवाल्यांच्यात सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com