मिरज पंचायत समिती उपसभापतिपद कॉंग्रेसकडे; भाजपचे दोन सदस्य फुटले

प्रमोद जेरे
Thursday, 18 February 2021

मिरज पंचायत समितीच्या उपसभापतिपदी कॉंग्रेसचे सदस्य अनिल आमटवणे यांची आज (बुधवारी) बहुमताने निवड झाली.

मिरज : येथील पंचायत समितीच्या उपसभापतिपदी कॉंग्रेसचे सदस्य अनिल आमटवणे यांची आज (बुधवारी) बहुमताने निवड झाली. त्यांना भाजपच्या सदस्या शुभांगी सावंत (मालगाव) आणि सुनीता पाटील (आरग) या दोघींनी कॉंग्रेसचे उमेदवार आमटवणे यांच्या बाजूने मतदान केले. यामुळे आमटवणे यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण बंडगर यांचा केवळ एक मताने पराभव झाला.

या उपसभापती पदाच्या निवडणुकीतील राजकीय डावपेचांमुळे सांगली जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय वातावरणाचे संकेत मिळाले आहेत. मिरज पंचायत समितीमधील भाजपच्या सदस्यांमध्ये पडलेली फूट आणि उपसभापतिपदी कॉंग्रेसचे अनिल आमटवणे यांची झालेली निवड ही भारतीय जनता पक्षातील अस्वस्थतेचे लक्षण समजले जात आहे. 

आज (बुधवारी) सकाळी 11 वाजता उपसभापती निवड प्रक्रियेस सुरुवात झाली. तत्पूर्वी गेल्या आठ दिवसांपासून विरोधी कॉंग्रेसच्या सदस्यांचे नियोजन सुरू होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मालगाव आणि आरग येथील पंचायत समिती सदस्यांनी या उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का देण्याचा निर्णय घेतल्याचे आजच्या त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले. 

दरम्यान, या निवडणुकीतील राजकीय खेळीमुळे पंचायत समितीमधील भाजपच्या वर्चस्वास धक्का लागल्याचेही स्पष्ट झाले आहे. निवडणुकीतील विजयानंतर प्रतिक्रिया देताना नूतन उपसभापती अनिल आमटवणे यांनी मिरज पंचायत समितीमधील या बदलाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर उमटलेले दिसतील.

आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षास पराभूत करण्यासाठी अशाच प्रकारचे धक्कातंत्र महाआघाडीचे नेते अमलात आणतील असे सांगितले. तर पराभूत उमेदवार किरण बंडगर यांनी शुभांगी सावंत आणि सुनीता पाटील या दोघींना सभापतिपदाची संधी देऊनही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. तसेच प्रस्थापित राजकीय नेत्यांनी केवळ मी बहुजन समाजाचा असल्याने माझा पराभव केल्याचाही आरोप केला. 

दरम्यान, मिरज पंचायत समितीमधील उपसभापती पदाची निवडणूक आणि त्यामध्ये भाजपला बसलेला धक्का यामुळे मिरज तालुक्‍यासह शहरातील आणि ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे नजीकच्या भविष्यकाळात वेगाने बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj Panchayat Samiti Deputy Chairman place goes to Congress; Two BJP members split