आमदार मुश्रीफ - विनय कोरे यांच्यात बंद खोलीत कोणती चर्चा ?

MLA Hasan Mushrif Vinal Kore Discussion On ZP President Election
MLA Hasan Mushrif Vinal Kore Discussion On ZP President Election

कोल्हापूर - जिल्हा परिषदेसाठी २ जानेवारीला अध्यक्ष निवड होत आहे. प्रत्येक नेता आपापले गटातील आकडे तपासून घेत आहे. कोण आपल्याबरोबर आणि कोण विरोधात याची पडताळणी करीत असताना आमदार हसन मुश्रीफ आणि माजी आमदार विनय कोरे यांच्यात अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. त्यानंतर, श्री. मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील यांचे पती अमर पाटील, सतीश पाटील व शशिकांत खोत यांच्याशी चर्चा केली. या वेळी, अमर पाटील यांनी आपल्या पत्नीसाठी उपाध्यक्षपद किंवा बांधकाम सभापतिपद मिळावे, अशी मागणी केली. शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाली. 

जिल्हा परिषदेमधील भाजप सत्ता हटविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. यापूर्वी जे भाजप-युती मित्र पक्षासोबत होते त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज आजच्या बैठकीकडे लक्ष होते. मात्र श्री कोरे आणि श्री मुश्रीफ यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी पाच ते दहा मिनिटासाठीच या सतीश पाटील, अमर पाटील व शशीकांत खोत यांच्याशी चर्चा केली. 

तुझ्यामुळे सावकरांचे नुकसान झाले : मुश्रीफ

राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत येण्यास इच्छुक असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांना सांगलीतील ‘जनसुराज्य’चा कार्यकर्ता भेटत असल्याचे कोणी तरी आमदार मुश्रीफ यांना सांगितले. यावर तो कार्यकर्ता सर्किट हाउसमध्येच दिसल्यानंतर मुश्रीफ यांनी त्याला चांगलेच सुनावले. श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘तू तुझ्या जिल्ह्यात राहूनच तुझे काम बघ. आमच्यात आणि सावकरांमध्ये हस्तक्षेप करू नको. तू कोणाला फोन करतो, कोणाला काय सांगतो, हे नसत्या उचापती करू नको. तुझ्यामुळे सावकरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत तू काहीही हस्तक्षेप करू नको,’’ असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी सर्किट हाउस परिसरात संबंधित कार्यकर्त्याला दिला. 

उर्वरित अडीच वर्षे भाजपबरोबर

जिल्हा परिषदेत पाच वर्षे आपण भाजपबरोबर राहणार आहे. उर्वरित अडीच वर्षेही आपण भाजपबरोबर असणार, असे स्पष्टीकरण माजी आमदार विनय कोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. 

कर्जमाफीबाबतही चर्चा 

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना होणार, याची माहिती घेण्यासाठी जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी आमदार मुश्रीफ यांनी चर्चा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com