Opportunity To Power In ZP Will Miss Due To Concentration On Minister Post
Opportunity To Power In ZP Will Miss Due To Concentration On Minister Post

मंत्रिपदाच्या नादात जिल्हा परिषदेतील सत्तेची संधी हुकणार? 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेत सत्ता आणण्याची महाविकास आघाडीला मोठी संधी चालून आली आहे. मात्र, राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची धडपड सुरू असल्याने जिल्हा परिषदेतील संधी हुकणार की काय?, अशी चर्चा सदस्यांत सुरू आहे. 

भाजपकडून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य फोडण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. घटक पक्षांना खूश करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत. या ऑफरमुळे सदस्यांत चुळबूळ सुरू झाली आहे. तर महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते मंत्रिपद मिळवण्यासाठी मुंबई-दिल्लीकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांच्याकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा फटका जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

अशी आली होती भाजपची सत्ता

जिल्हा परिषदेत पावणेतीन वर्षांपूर्वी भाजप, जनसुराज्य, शिवसेना व मित्रपक्षांची सत्ता आणण्यात भाजपने यश मिळवले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपला अध्यक्षपद मिळाले. 
भाजपला सत्तेत आणण्यात भाजप (14), शिवसेना (7), जनसुराज्य (6), ताराराणी पक्ष आघाडी (2), स्वाभिमानी संघटना (2), आवाडे गट (2), युवक क्रांती आघाडी (2) व अपक्ष 1, अशा 37 जणांचा वाटा आहे. तर कॉंग्रेसच्या रेश्‍मा राहुल देसाई व राष्ट्रवादीचे विजय बोरगे यांनी अनुपस्थित राहत भाजपला मदत केली. 

भाजपकडील 7 पैकी 6 जण आघाडीत जाण्याची शक्‍यता 

पावणेतीन वर्षांच्या एकांगी कारभाराने व शब्द न पाळल्याने घटक पक्षांनी भाजपला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शेतकरी संघटना (2) व अपक्ष (1) यांचा समावेश आहे; तर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्याने भाजपकडील 7 पैकी 6 सदस्य या आघाडीत जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्यांच्याशी अजून अधिकृतपणे कोणीही चर्चा केलेली नाही. 


आघाडीच्या दुर्लक्षाचा भाजपला फायदा 

भाजपला पुन्हा सत्तेत येणे अडचणीचे असले तरी सत्ता बदलासाठी म्हणावी तेवढी ताकद कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने लावलेली नाही. राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना संधी मिळणार असली तरी कोणते खाते मिळणार?, जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळणार का?, असा प्रश्‍न आहे. कॉंग्रेसमधून जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. दररोज ही नावे मागेपुढे होत असल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. तर शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर हे देखील मंत्रिपदासाठी आग्रही असल्याने जिल्हा परिषदेच्या सत्ता बदलाकडे दुर्लक्ष झाले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com