सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 December 2019

विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्‍टोबरला लागला. निकालात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची कोंडी केली होती. भाजपनेही शिवसेनेची मागणी धुडकावून लावल्याने अखेर दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. 

कोल्हापूर - राज्यातील सत्तानाट्याच्या पार्श्‍वभूमीवर गेले दोन आठवडे मुंबईत तळ ठोकून असलेले जिल्ह्यातील आमदार आज कोल्हापुरात परतले. आमदार फोडाफोडीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या आमदारांना आठवड्यापेक्षा अधिक काळ जयपूरमध्येच ठेवण्यात आले होते. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची बडदास्त मात्र मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये केली होती. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्‍टोबरला लागला. निकालात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची कोंडी केली होती. भाजपनेही शिवसेनेची मागणी धुडकावून लावल्याने अखेर दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. 

हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ? 

काँग्रेसचे आमदार जयपूरात

या संपूर्ण राजकीय घडामोडीत आमदारांचा मुक्काम मात्र मुंबईतच होता. 23 नोव्हेंबरला "राष्ट्रवादी'चे नेते आमदार अजित पवार यांनी बंडखोरी करीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर राज्यात राजकीय भूकंप झाला. श्री. पवार यांच्याबरोबर कोण जाणार, या चर्चेने "राष्ट्रवादी'च्या आमदारांतच संशयाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मुंबईबाहेर असलेल्या आमदारांना कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने मुंबईत बोलवून घेतले. 12 दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विधानसभेचे सर्वच आमदार मुंबईत होते. कॉंग्रेसला 44 जागांवर विजय मिळाला आहे. पण, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय लांबत होता. त्यातून आमदारांत अस्वस्थता होती. त्यामुळे काही आमदार भाजपच्या गळाला लागतील, अशी भीती निर्माण झाल्याने कॉंग्रेसच्या सर्वच आमदारांना जयपूर येथे ठेवले होते. आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस या आमदारांचा मुक्काम जयपूरमध्येच होता. 26 नोव्हेंबरला सत्तास्थापनेचा कल स्पष्ट झाल्यानंतर त्याचदिवशी सर्व आमदारांना मुंबईत आणले. तोपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादीचे आमदार मुंबईतीलच पंचतारांकित हॉटेलात वास्तव्याला होते. फुटण्याची शक्‍यता असलेल्या आमदारांवर "वॉच' ठेवण्यात येत होता. सोबत असलेले वाहनचालक, स्वीय सहायक यांचीही सोय त्याच हॉटेलमध्ये होती. 

हेही वाचा - देवगडची विरोधी बाकाची परंपरा कायम 

महालक्ष्मी एक्‍स्प्रेसने कोल्हापुरात दाखल

सत्तानाट्य संपुष्टात आल्यावर जिल्ह्यातील बहुतांश आमदार आज कोल्हापुरात परतले. "राष्ट्रवादी'चे आमदार हसन मुश्रीफ काल (ता. 1) रात्रीच कागलमध्ये दाखल झाले. आज पहाटेपासून त्यांनी लोकांच्या भेटागाठी घेतल्या. दुपारी बॅंकेत त्यांनी संचालकांच्या एका बैठकीला हजेरी लावली. इतर आमदार आज महालक्ष्मी एक्‍स्प्रेसने कोल्हापुरात दाखल झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Returns To Home After 12 Days