चंद्रकांतदादांवर खासदार मंडलिकांचा पलटवार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 October 2019

लोकसभा निवडणुकीच्या काळात ते माझ्या विरोधात होते. त्यांच्यासाठी मी काम करणे शक्‍यच नव्हते. आणि माझी ही भूमिका कोठे दडवलीही नव्हती.

कोल्हापूर - मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत त्यांची बी टिम उभी केली. त्यांनीच शिवसेनेचे उमेदवार पाडले. आणि त्या कृत्याची पावती ते माझ्या नावावर फाडत आहेत, असा पलटवार खासदार संजय मंडलिक यांनी आज सकाळशी बोलताना केला.

मंडलिक यांची भूमिकाच जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांच्या पराभवास कारणीभूत ठरली. असा आरोप मंत्री पाटील यांनी केला होता. 

मंडलिक प्रवृत्तीचा शिवसेनेने विचार करावा : चंद्रकांत पाटील 

जिल्ह्यात जेथे जेथे युतीचे उमेदवार उभे होते, तेथे दादांची बी टीम कार्यरत होती. असा आरोप करत संजय मंडलिक यांनी केला आहे.  आपण कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात युतीच्या उमेदवारासाठी कार्यरत नव्हतो हे त्यांनी मान्य केले.

चंदगड राष्ट्रवादीच्या विजयात सहभाग नाही - मंडलिक

खासदार मंडलिक म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या काळात ते माझ्या विरोधात होते. त्यांच्यासाठी मी काम करणे शक्‍यच नव्हते. आणि माझी ही भूमिका कोठे दडवलीही नव्हती. चंदगडमध्ये माझे भाऊजी राष्ट्रवादीकडून उभे होते. एवढेच नव्हे तर संग्राम कुपेकर ही माझे भाऊजीच लागतात. जिल्ह्यात माझे इतके नातेवाईक राजकारणात आहे की प्रत्येकासाठी मी भूमिका कशी बदलत राहिन ? त्यामुळे चंदगड राष्ट्रवादीच्या विजयात माझा सहभाग नाही. 

बी टीमचे उमेदवार युतीच्याच विरोधात 

खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकीत ग्रामपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा यांचे सदंर्भ वेगवेगळे असतात. जिल्ह्यात दोन्ही खासदार शिवसेनेचे म्हटल्यावर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, विधानसभेत शिवसेनेचीच सत्ता येईल असे गृहीत धरणे चुकीचे आहे. कारण प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगवेगळे असतात. गावात ग्रामपंचायतीला काँग्रेसला मतदान करणारे लोक लोकसभेला काँग्रेसलाच मतदान करतील, असे होत नाही. आणि कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात युतीची काही प्रमाणात पडझड झाली आहे. कारण गाव, शहर, जिल्हा, पातळीवर गटातटाचे राजकारण खूप वेगळे असते. त्याचा परिणाम निकालावर झाला आहे. चंद्रकांतदादांनी या परिस्थितीचे खापर माझ्यावर फोडू नये. त्यांनी त्यांचे बी टीमचे उमेदवार युतीच्याच विरोधात उभे केले होते, असा माझाही त्यांच्यावर आरोप आहे. 

चंद्रकात पाटलांनी जनतेलाच विचारले, आमचं काय चुकलं? 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sanjay Mandlik reaction on Minister Chandrakant Patil comment