"लोककला संवर्धना'त सिद्धेश्‍वरांच्या नंदीध्वजांचा समावेश!

अशोक मुरूमकर / सुस्मिता वडतिले
बुधवार, 15 जानेवारी 2020

नंदीध्वज पेलण्यासाठी इतर कला प्रकारांप्रमाणेच कित्येक दिवस अगोदर सराव करावा लागतो. ही परंपरेनुसार आलेली कला असून तिचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. श्री सिद्धेश्‍वर यात्रेतील नंदीध्वज पेलण्याच्या कलेचा लोककलेत समावेश होणे आवश्‍यक होते. त्यानुसार त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या प्रकाराचे छायाचित्रण सुरू आहे.

सोलापूर : सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सोलापूरच्या श्री सिद्धेश्‍वर यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या नंदीध्वजांचा राज्य सरकारच्या "लोककला संवर्धन' प्रकल्पात समावेश झाला आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून माहितीसह छायाचित्रे, व्हिडिओ चित्रीकरण, संदर्भवृत्त व माहिती जमा केली जात आहे. यासाठी संचालनालयाचे प्रतिनिधी सोलापुरात मुक्कामास आहेत. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने याबाबतची माहिती देण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा - दिड्डम... दिड्डम... सत्यम सत्यम...!

सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन
सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून शासकीय पातळीवरील सांस्कृतिक कामासंबंधीच्या योजना कार्यान्वित करण्यात येतात. राज्यातील सांस्कृतिक अंगाची नागरिकांना माहिती व्हावी, भावनात्मक ऐक्‍य निर्माण व्हावे यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना व व्यक्तींना प्रोत्साहन दिले जाते. त्यात राज्य नाट्य महोत्सव, राज्य चित्रपट महोत्सव, तसेच संगीत, नृत्य, तमाशा, कीर्तन, भजन, लोककला, खडी गंमत, शाहिरी आणि दशावतार महोत्सव आदी विविध कलामहोत्सव घेतले जातात.

हेही वाचा - केंद्राचा निर्णय.... वाढविले खासदारांचे अधिकार

लोककला संवर्धनासाठी नंदीध्वजांचा समावेश
याशिवाय या संचालनालयातर्फे नाट्य प्रशिक्षण शिबिरे, तमाशा प्रशिक्षण शिबिरे, बालनाट्य प्रशिक्षण शिबिरे, कीर्तन प्रशिक्षण शिबिरे व शाहिरी प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. राज्यातील कलाप्रकारांचे संवर्धन व्हावे यामागचा उद्देश असतो. त्यातच सोलापुरातील कलाप्रकारांचे संवर्धन व्हावे म्हणून "लोककला संवर्धन' हा प्रकल्प राबविला जात आहे. त्यात श्री सिद्धेश्‍वर यात्रेतील नंदीध्वजांचे नाव सुचवण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचा - "सरजी' तुरुंगातून आले अन्‌ राष्ट्रवादीला मतदान करून गेले

नंदीध्वज पेलणे ही लोककलाच
सोलापुरात विविध कलांचे प्रकार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यात सर्वांत मोठी कला ही नंदीध्वज पेलण्याची आहे. ही कला राज्यात कोठेही सादर केली जात नाही. नंदीध्वज पेलणे ही कला असल्याचे आम्ही संबंधितांना पटवून दिले होते. कारण नंदीध्वज पेलण्यासाठी इतर कला प्रकारांप्रमाणेच कित्येक दिवस अगोदर सराव करावा लागतो. ही परंपरेनुसार आलेली कला असून तिचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. श्री सिद्धेश्‍वर यात्रेतील नंदीध्वज पेलण्याच्या कलेचा लोककलेत समावेश होणे आवश्‍यक होते. त्यानुसार त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या प्रकाराचे छायाचित्रण सुरू आहे.
- डॉ. रवींद्र चिंचोलकर, समन्वयक, लोककला संवर्धन प्रकल्प, सोलापूर जिल्हा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Nandidhwaj included in folk art conservation