Video : रोहित पवारांनी घेतले यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

या निवडणुकीत जिंकण्यासाठी काय करायचे याबाबत अनेकांनी सांगितले होते. मात्र, त्यातील चांगल्या गोष्टींचे आचरण करून निवडणूक जिंकली आहे.

कराड : 'यशवंतराव चव्हाण हे संपूर्ण राज्याचे प्रेरणास्थान आहेत. जिल्हा परिषद निवडणूक जिंकलो, त्यावेळी समाधीस्थळावर येऊन अभिवादन केले होते. आता विधानसभा निवडणुकीत लोकांनी दिलेल्या आशीर्वादानंतर प्रेरणास्थान असणाऱ्या या समाधीस्थळी मी अभिवादन करण्यासाठी आलो आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी आमदार पवार शुक्रवारी कराडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

- Video : साताऱ्यातील विजयानंतर श्रीनिवास पाटील पवारांच्या भेटीला!

पहिल्याच विधानसभा निवडणुकीचा अनुभव चांगला असल्याचे सांगून ते म्हणाले, 'या निवडणुकीत जिंकण्यासाठी काय करायचे याबाबत अनेकांनी सांगितले होते. मात्र, त्यातील चांगल्या गोष्टींचे आचरण करून निवडणूक जिंकली आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, चार महिन्यांपूर्वी निवडणुकीत त्यांना लोकांनी निवडून दिले होते. लोकशाहीचा निर्णय मान्य करायला हवा होता. मात्र त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला. त्यामुळे या निवडणुकीत लोक श्रीनिवास पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले.' 

- 'भाजपचा सत्तेचा अहंकार जनतेनं उतरवला'; विरोधकांकडे 117 आमदारांचे बळ!

राज्यात महाआघाडीला चांगले यश मिळाले आहे. आकडेवारीत जरी आघाडी मागे असली तरी लोकांचा विचार बदलत असल्याचे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले. सत्ता स्थापनेबाबतच्या प्रश्नावर आमदार पवार यांनी त्याबाबतचा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार घेतील, असे सांगितले.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रचारात सहभागी न झाल्याबाबत ते म्हणाले, काँग्रेसचे केंद्रातील वरिष्ठ नेते प्रचारात सहभागी झाले असते, तर आघाडीला त्याचा निश्चित फायदा झाला असता. मात्र, तो त्यांचा अंतर्गत निर्णय आहे.

- सत्तेच्या हालचालींना वेग..! शिवसेना काढणार अपमानाचा वचपा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Rohit Pawar visited Yashwantrao Chavan memorial after Vidhan Sabha victory