अजित पवार आणणार कराडला औद्योगिक कॉरिडोर ?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

याबाबत सातारा जिल्ह्यातील जमिनीबाबत अंतिम निर्णय तांत्रिक व व्यवहार्यता अहवाल मिळाल्यानंतर घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

सातारा : मुंबई-बंगळूर महामार्गालगत औद्योगिक कॉरिडोर उभारण्याच्या सात वर्ष जुन्या प्रस्तावाचे पुनरुज्जीवन होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील जागेसाठी तांत्रिक व व्यवहार्यता अहवालाचे आदेश दिले होते. मंत्री पवार यांनी मुंबई येथे नुकतीच उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत सांगली, सोलापूर व मराठवाड्याच्या काही भागांजवळ असलेला सातारा जिल्हा हा औद्योगिक कॉरिडोरसाठी निवडला. या उच्चस्तरीय बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर आणि केंद्र सरकारच्या हाती असलेल्या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकारी उपस्थित होते.

मुंबईच्या विधान भवनात झालेल्या आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासाठी स्वतंत्र कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावित कंपनीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे 51 टक्के आणि 49 टक्के भागीदारी असेल.
केंद्र सरकारने मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गासह दोन विशेष विभाग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून राज्य सरकारला 3,000 कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. कर्नाटकने यापूर्वीच विशेष झोनसाठी धारवाड जिल्ह्याची निवड केली आहे. दोन राज्यांनी संबंधित ठिकाणी औद्योगिक क्षेत्र विकसित करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : मोदी, शहांमुळेच दिल्लीत दंगल; पृथ्वीराज चव्हाणांचा घणघणात

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फेब्रुवारी 2013 मध्ये हा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावानुसार, औद्योगिक व कृषी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोरच्या धर्तीवर सहाय्यक कॉरीडोर विकसित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्याच्या कडेला असलेले सातारा, सांगली, कोल्हापूर हे जोडण्यासाठी सुचविले होते.

प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकचा समावेश आहे आणि तो सुमारे 1000 किमीपर्यंत पसरला जाईल. कर्नाटकात, दावणगेरे, चित्रदुर्ग, हुबळी-धारवाड आणि बेळगवी या जिल्ह्यांचा समावेश आहे. नोव्हेंबर 2013 मध्ये, जपानच्या सहाय्याने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रमाणेच कॉरिडॉर विकसित करण्यात ब्रिटन सरकारने रस दाखविला होता.

जरुर वाचा : निकाल कळल्यावर अनेकींना अश्रू आणि संताप अनावर झाला

उद्योग मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, सरकार सातारा जिल्ह्यातील फलटण किंवा कराडजवळील भागासाठी उत्सुक आहे. यापुर्वीच फलटण येथे उद्योगांसाठी विकसित केला जात असून कालव्याद्वारे पाणी आहे. कराड हे सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या जवळच असून कृष्णा नदीमुळे पुरेसे पाणीपुरवठा करण्याची स्थिती आहे. कराडमध्ये विमानतळ विकसीत केले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वाचा : शाब्बास : अक्षता पडण्यापुर्वी पाेलिसांनी राेखला विवाह 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Industrial Corridor May Be In Karad