बेळगावात दिसणार आता फेट्यातल्या गणेशमूर्ती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

बेळगाव शहरासह परिसरात यंदा श्रीमूर्तीला फेटा बांधण्याची क्रेझ वाढली आहे. 

बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे घरगुती गणेशमूर्तींच्या सजावटीत गणेशभक्त गुंतले आहेत. बेळगाव शहरासह परिसरात यंदा श्रीमूर्तीला फेटा बांधण्याची क्रेझ वाढली असून अनेकजण श्रीमूर्तीला फेटा बांधून घेताना दिसत आहेत.

शहरासह परिसरात सध्या गणेशभक्त आरास करण्यात व्यस्त झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही खास करून श्रीमूर्तीची सजावट केली जात आहे. अनेकजण मूर्तीवर मोतीवर्क करताना दिसत आहेत. दोन फुटांपासून पाच फुटांपर्यंतच्या मूर्तींना फेटा बांधून घेण्याचे प्रमाण शहरात वाढले आहे. यासाठी एकूण चार पद्धती असून पुणेरी, कोल्हापूर, मावळे व श्री कृष्ण पद्धतीत फेटा बांधला जात आहे.

हेही वाचा - हापालिकेचे 120 खाटांचे कोविड रूग्णालय आजपासून सेवेत..

बेळगावात १० ते १५ जण फेटे बांधणारे आहेत. लहान गणेश मूर्तीला फेटा बांधण्यासाठी पाचशे रुपये, दीड फुटाच्या श्रीमूर्तीला ८०० रुपये, यापेक्षा मोठी मूर्ती असेल तर उंचीनुसार पैसे घेतले जातात. एक फेटा बांधण्यासाठी सुमारे ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. श्रीमूर्ती विसर्जन होईपर्यंत फेटा सुटू नये म्हणून श्रीमूर्तीला फेटा बांधताना गमचा वापर केला जातो. यामुळे विसर्जनावेळी फेटा काढताना श्रीमूर्तीला धक्का लागण्याची शक्‍यता असते. यामुळे बहुतांशी फेटे बांधणाऱ्यांकडून फेटासहीत श्रीमूर्ती विसर्जन करण्याचा सल्ला दिला जातो. 

हेही वाचा -  ऑनलाईन शिक्षणावर भिस्त नको; नव्या कल्पना सूचवा...

"यंदा श्रीमूर्तीला फेटे बांधून घेण्याची क्रेझ वाढली आहे. आपण आतापर्यंत अनेक श्रीमूर्तींना फेटे बांधले आहेत. फेटा बांधल्यामुळे श्रीमूर्ती आकर्षक दिसते. बेळगाव शहरात फेटे बांधणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे."

-नरेश जाधव, कलाकार

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new trend of wearing various feta on ganesh murti in belgaum