हुक्केरीजवळ नऊ किलो सोने, 17 लाखांची रोकड जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांना कागदपत्राविना सोने व रोकड नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्याबाबत त्यांनी हुक्केरीचे मंडल पोलिस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी व पोलिस उपनिरीक्षक शिवानंद गुडगनटी यांना सूचना केली.

हुक्केरी ( बेळगाव ) - हुक्केरीजवळील गजबरवाडी क्रॉसनजिक कोणत्याही कागदपत्राविना नेण्यात येणारे नऊ किलो सोने व सतरा लाख रुपायांची रोकड आज (ता. 8 ) जप्त करण्यात आली. जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्‍केरीचे मंडल पोलिस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, पोलिस उपनिरीक्षक शिवानंद गुडगनटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी महाराष्ट्रातील हर्षा पोरवाल व रणजीत सिंह यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांना कागदपत्राविना सोने व रोकड नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्याबाबत त्यांनी हुक्केरीचे मंडल पोलिस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी व पोलिस उपनिरीक्षक शिवानंद गुडगनटी यांना सूचना केली. तत्काळ या दोघांनी पोलिस पथकासह गजबरवाडी क्रॉसवर जाऊन ही कारवाई केली. यावेळी हर्षा पोरवाल व रणजीत सिंह यांच्याकडे कोणत्याही कागदपत्राविना नेण्यात येणारे तब्बल नऊ किलो सोने व 17 लाखाची रोकड मिळाली. ते त्यांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने व रोकड मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - धक्कादायक ! सुट्टीसाठी चालकाने केला मालकाचा खून 

सोने आणि रोकड नेमकी कोणाची ?

बेळगाव व कोल्हापूर या जिल्ह्यांचा सीमाभागात समावेश होतो, हे सोने आणि रोकड नेमकी कोणाची आणि ते कोठे घेऊन जात होते, याची माहिती तपासाअंती स्पष्ट होणार आहे. सध्या त्याबाबत पोलिसांकडे अधिक माहिती मिळू शकलेली नाही. व्यावसायिक कर आणि प्राप्तीकर खात्यातर्फे याबाबत अधिक माहिती उघड होऊ शकणार आहे. जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक गैरव्यवहार व अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. कर्नाटक पोलीस कायदा कलम 98 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

हेही वाचा - राणेंच्या पनवतीमुळेच भाजपची गाडी घसरली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine kilos Gold 17 Lakh Cash Seized Near Hukkari