पुणे- मुंबईकरांवर बारकाईने लक्ष ठेवा; म्हारुगडेवाडीतही जिल्हा प्रशासन अलर्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची साखळी महत्त्वाची आहे. त्यासाठी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी साखळी तोडण्यासाठी स्वतःहून तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

उंडाळे (जि.सातारा) : उंडाळे विभागातील म्हारुगडेवाडीत 60 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला मंगळवारी ता.7 दुपारी प्राप्त झाला. त्यामुळे उंडाळे विभागात खळबळ उडाली. प्रशासनही अलर्ट झाले असून, पुढील उपाययोजना सुरू झाल्या आहेत. दरम्यान संबंधित व्यक्‍तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांनाही उपचारासाठी आणण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने सुरू केली आहे. आतापर्यंत 33 जणांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे.
 
तांबवे येथील एका रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित आला होता. त्या रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत, तर आज तालुक्‍यातील म्हारुगडेवाडी येथील एका 60 वर्षीय रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. तालुक्‍यात सलग दुसरा रुग्ण सापडल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. संबंधित गावातील लोक कामानिमित्ताने मुंबई व परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. संबंधित रुग्ण 28 मार्चला आपल्या नातेवाइकाच्या रिक्षामधून मुलीसह दोन नातवंडाबरोबर गावाकडे आला. त्यांना चार दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने संबंधित व्यक्ती जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली. त्या वेळी संबंधित व्यक्तीची लक्षणे कोरोनासदृश्‍य असल्याची शंका डॉक्‍टरांना आली. त्यांनी त्यांना सरकारी रुग्णालयात तपासणी करण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्ती दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात जाऊन तात्पुरती उपचार घेऊन आली. मात्र तरीही त्रास कमी होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी संबंधिताना कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या घशातील श्रावाचे नमुने पुणे येथे पाठवले असता आज (मंगळवार) त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे म्हारुगडेवाडीत हाय अलर्ट जारी झाला आहे. 

प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, उंडाळे ग्रामीण रुग्णालयाचे पथक तेथे दाखल झाले आहे. त्यांच्याकडून संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना स्वतःहून तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले जात आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत नातेवाइकांसह अन्य 33 जणांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हारुगडेवाडीत पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी गावामध्ये येणारे सर्व रस्ते बंद सील केले आहेत. पोलिसांकडून घराबाहेर येणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

 

मुंबई- म्हारुगडेवाडी साखळी 

संबंधित कोरोनाबाधित व्यक्ती 28 मार्चला आपल्या नातेवाइकांच्या रिक्षामधून मुलीसह दोन नातवंडाबरोबर गावाकडे आली आहे. संबंधित व्यक्ती आठवड्यात कोणा- कोणाच्या संपर्कात आली याचा शोध आता आरोग्य विभाग आणि पोलिसांनी सुरू केला आहे. संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची साखळी महत्त्वाची आहे. त्यासाठी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी साखळी तोडण्यासाठी स्वतःहून तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Coronavirus : उपचार ते अंत्यसंस्कार... आरोग्य कर्मचाऱ्यांचा लढा

पुणे- मुंबईकरांवर बारकाईने लक्ष ठेवा : जिल्हाधिकारी

कऱ्हाड : पुणे- मुंबईवरून आलेल्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील समित्यांनी त्याची वेळीच काळजी घ्यावी. ज्या पुणे- मुंबईच्या रुग्णांची तपासणी झाली आहे, त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज येथे अधिकाऱ्यांना केल्या. 
कऱ्हाड तालुक्‍यात तांबवेनंतर म्हारुगडेवाडीत दुसरा कोरोनाच्या बाधित रुग्ण सापडल्याने जिल्हाधिकारी सिंह यांनी तातडीची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
 
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी पहिल्यांदा संबंधित यंत्रणेकडून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी संबंधित रुग्ण जेथून आला तेथून त्याच्या गावापर्यंतच्या प्रवासाची, तो कोणाला भेटला याची माहिती घ्या, अशा सूचना केल्या. ते पुढे म्हणाले, ""पुणे- मुंबईवरून आलेल्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. ग्रामीण भागात सरपंच, पोलिस पाटील यांच्या ज्या समित्या नेमल्या आहेत त्या समित्यांनी त्याची वेळीच काळजी घेणे आवश्‍यक आहे. ज्या पुण्या- मुंबईच्या रुग्णांना क्वारंटाइन केले आहे ते त्या काळात घराबाहेर येणार नाहीत यासाठीही यंत्रणेने दक्ष राहावे. कऱ्हाड तालुक्‍यात यंत्रणा चांगले काम करत आहे. मात्र, अलीकडेच दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे यापुढे सर्वच विभागाने समन्वयाने दक्ष राहून काम करावे.

आपण पॉझिटिव्ह तर नाही ना, या विचाराने ते रात्रभर झोपलेच नाही

दुबईहून आलेली महिला झाली कोरोना मुक्त; 39 संशयितांच्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number Of Coronavirus Suspected Patient Are Increasing In Satara District