VIDEO : गडहिंग्लजला रंगली देखणी म्हैस स्पर्धा; कोण जिंकले ? वाचा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

देखणी म्हैस व देखणा रेडा स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील शौकीन म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर सकाळपासूनच गर्दी केली होती. पशूपालकांनी आपापल्या म्हैशी व रेड्याला आकर्षकपणे सजविले होते.

गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील अर्जून रिफायनरी उद्योग समुहातर्फे उद्योजक संतोष शिंदे यांच्या पुढाकाराने झालेल्या देखणी म्हैस स्पर्धेत हेर्लेच्या नूतन पाटील यांच्या मुऱ्हा म्हैशीने तर देखणा रेडा स्पर्धेत साहिल शिंदे (हिरलगे, ता. गडहिंग्लज) यांच्या रेड्याने प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही स्पर्धकांना 'अर्जून श्री देखणी म्हैस व देखणा रेडा' चा बुहमान देवून गौरविण्यात आले. दरम्यान, स्पर्धेचे आकर्षण असलेल्या हलगी वादनामध्ये कोल्हापूरच्या नवनाथ कांबळे व योगेश कवाळे यांची जोडी प्रथम आली.

 

म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटकातून 80 म्हैशी, 25 रेडे सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या जनावर संगोपनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतुने या स्पर्धा दरवर्षी घेतल्या जात असल्याचे सांगून स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला एक अर्जून सरकी पेंडचे पोते व महिलांसाठी अर्जून सरकी तेलाचा कॅन भेट देण्यात आल्याचे उद्योजक संतोष शिंदे यांनी यावेळी सांगितले. परीक्षक म्हणून डॉ. चोथे, अरविंद पाटील, डॉ. जाधव, श्री. बेळगुद्री यांनी काम पाहिले. उद्योजक संतोष शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. 

हेही वाचा - ॲन्टीबायोटिक इंजेक्‍शनमुळे पाच विद्यार्थी अत्यवस्थ 

हलगी वादन स्पर्धा 

दरम्यान, देखणी म्हैस व देखणा रेडा स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील शौकीन म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर सकाळपासूनच गर्दी केली होती. पशूपालकांनी आपापल्या म्हैशी व रेड्याला आकर्षकपणे सजविले होते. तेलाने मालीश करण्यासह शिंगांना गोंडे लावले होते. यानिमित्त हलगी वादन स्पर्धाही झाल्या. हलगीच्या कडकडाटाने स्पर्धेत उत्साह संचारत होता. चांगल्या म्हैशी व रेड्याला उपस्थितांकडून टाळ्यांनी आणि शिट्यांनी दाद दिली जात होती. हौशी पशूपालक संबंधित मालकाकडे जावून म्हैशी व रेड्याच्या संगोपनाची माहिती घेत होते.

हेही वाचा - ग्रामीण साहित्य संमेलनात राजू शेट्टी म्हणाले, 
 

स्पर्धेतील विजेते

देखणी म्हैस गटात वंदना जरळी (गडहिंग्लज) यांची जाफराबादी म्हैस द्वितीय, सुवर्णा शिनगारे (येळ्ळूर) यांची पंढरपुरी म्हैस तृतीय तर यशोदा रेडेकर (जरळी, ता. गडहिंग्लज) यांच्या देशी म्हैशीने चौथा क्रमांक मिळविला. देखणा रेडा स्पर्धेत बाळकृष्ण सामंत (दरडेवाडी) यांचा रेडा द्वितीय व राजाराम गोरूले (हरळी बुद्रुक, ता. गडहिंग्लज) यांच्या रेड्याने तिसरा क्रमांक पटकावला. हलगी वादनात नरसिंह हलगी ग्रुप (सांगवडे) द्वितीय तर धिरज साठे व अक्षय आवळे यांच्या जोडीने तृतीय क्रमांक मिळविला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nutan Patil Buffalo Wins In Gadhinglaj Competition