निःस्पृह आणि किमयागार नेतृत्व 

Overview of Ramnath Wagh's work
Overview of Ramnath Wagh's work

ऍड. रामनाथ वाघ म्हणजे "अण्णा' नावाने परिचित असणारे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. राजकारणात असूनही कोणत्याही वादात न अडकता वा कोणाच्या उखाळ्यापाखाळ्या न काढता ऍड. वाघ यांनी, होईल तेवढ्या समाजसेवेचे ध्येय बाळगून त्यात यश मिळविले. वाघ यांच्या बालपणाची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्यांना सातवीनंतर किराणा दुकानात काम करावे लागले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा गाडा सावरीत त्यांनी बी.ए., एलएल. बी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. वकिलीची सनद मिळविल्यानंतर 1962 ते 71 अशी दहा वर्षे त्यांनी राहुरी व नगरच्या न्यायालयात वकिली केली. त्या काळातच न्यायालयात येणाऱ्या खेड्यापाड्यांतील अशिक्षित समाजाच्या व्यथा, वेदना त्यांना अस्वस्थ करीत. या समाजासाठी, त्यांच्या गरीब मुलाबाळांसाठी काहीतरी करण्याचा विचार मनात आला आणि कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना त्यांनी राजकारणात उडी घेतली. तळागाळातील समाजाचा प्रतिनिधी म्हणून राजकारणात आलेल्या वाघ यांनी पुढे विविध कामगार संघटना स्थापन करून त्या नावारूपाला आणल्या. 40 वर्षांच्या राजकारणात चांगल्या कामाचा व कार्यकर्त्यांचा नेहमी सन्मान करीत त्यांनी "स्टॅंडर्ड' राजकारण केले. 

जिल्हा परिषदेतून राजकारणाची सुरवात 
शालेय जीवनापासूनच वाघ यांना समाजकार्याची आवड होती. राजकारणात आल्यानंतर कॉंग्रेस सेवा दल, जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस व अध्यक्ष ही पदे वाघ यांनी भूषविलीच; शिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा सत्याग्रह, शेतकरी संघटना यांमध्येही त्यांनी वेळोवेळी भाग घेऊन तुरुंगवास भोगला. सन 1972च्या विधानसभा निवडणुकीत वाघ यांना कॉंग्रेसने राहुरी मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्या वेळी त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर दोनच महिन्यांनी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र वाघ यांनी वांबोरी गटातून विजय मिळविला. विशेष म्हणजे त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही मिळाले. त्यानंतर लगेच वाघ यांनी रोजगार हमी योजनेतून एक हजार पाझर तलाव करण्याची घोषणा केली आणि लगेच कामाला गती दिली. 

दूध धंद्याच्या वाढीला प्रोत्साहन 
1972-73च्या काळात दुग्धोत्पादनात राज्यात जळगाव जिल्हा अग्रेसर होता. वाघ यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातही दूध धंद्याच्या वाढीला प्रोत्साहन दिले. त्यांच्याच पुढाकाराने दुग्धोत्पादनात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रांती झाली. परिणामी जिल्ह्याने दुग्धोत्पादनात राज्यात आघाडी घेतली. ती अद्याप टिकून आहे. कुटुंबनियोजन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी वाघ यांनी आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या काळात विशेष भर दिला. त्यामुळे कुटुंबनियोजनाचा प्रचार व प्रसार अधिक प्रमाणात झाला. जिल्ह्यात कापूस लागवडीला त्यांनी प्राधान्य दिले. पारनेर, शेवगाव, अकोले व पाथर्डी येथील महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी जिल्हा परिषदेकडून 50 हजार ते एक लाखांपर्यंतच्या देणग्या देण्यास त्यांनी विशेष पुढाकार घेतला. 

पाणी परिषद आणि एक सिंचन योजना 
कॉंग्रेसमध्ये माळीवाडा शाखेच्या अध्यक्षपदापासून ते जिल्हाध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. जिल्हाध्यक्षपदाच्या सहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी कॉंग्रेस पक्ष एकसंध ठेवून पक्षवाढीकरिता विशेष प्रयत्न केले. वांबोरी या आपल्या गावाला मुळा धरणाचे पाटाचे पाणी मिळावे, यासाठी त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या उपस्थितीत वांबोरीला पाणी परिषद आयोजित करून सिंचन योजनांद्वारे 15 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणले. पुढे तीन हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणणारी आणखी एक सिंचन योजना अमलात आणली. विशेष म्हणजे त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च सरकारी निधीतून केला.

"जिल्हा मराठा'त उल्लेखनीय योगदान 
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या शिक्षण संस्थेवर 1958पासून विश्‍वस्त म्हणून आणि 2003पासून उपाध्यक्ष म्हणून वाघ यांनी काम केले. या संस्थेचे विधी महाविद्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला. महाराष्ट्र सिंचन विकास महामंडळ, भू-विकास महामंडळ, शेती महामंडळ, कृषी उद्योग विकास महामंडळ या संस्थांवर वाघ यांनी संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली. "वनराई'चेही ते पदाधिकारी होते. पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य व कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणूनही वाघ यांनी काम केले. विद्यापीठ सदस्यत्वाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महाविद्यालयांना भेट देत युवकांना शिक्षण, तसेच सामाजिक कामाचे महत्त्व समजावून सांगण्यास पुढाकार घेतला. त्याबद्दल विद्यापीठाने त्यांचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून गौरव केला. नगरच्या नगरपालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी योगदान दिले. 

यशवंतराव चव्हाण व्यासपीठाची स्थापना 
वाघ यांनी ज्येष्ठ नेते (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र करून यशवंतराव चव्हाण व्यासपीठाची स्थापना केली. या व्यासपीठाच्या माध्यमातून (कै.) चव्हाण यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याची मोहीम हाती घेतली. चर्चासत्रे, व्याख्याने व अन्य विविध उपक्रम त्यांनी राबविले. एवढेच करून ते थांबले नाहीत, "युगप्रवर्तक यशवंतराव' हा 700 पानांचा स्मृतिग्रंथ वाघ यांनी तयार केला. (कै.) चव्हाण यांच्यासमवेत काम केलेल्या विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना लिहिते केले. (कै.) चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी समाजासमोर आणले. 

वांबोरीशी नाळ जोडलेलीच राहिली 
दादासाहेब रूपवते यांच्या पुढाकाराने 1982मध्ये नगरमध्ये झालेल्या चौथ्या दलित साहित्य संमेलनात, तसेच आमदार यशवंतराव गडाख यांच्या पुढाकाराने नगरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वाघ सक्रिय होते. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थाचालक महामंडळाच्या पुणे विभागाचे ते पंधरा वर्षे अध्यक्ष होते. या महामंडळाच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रातील विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. हा सर्व व्याप सांभाळताना आपल्या वांबोरी गावाशी जोडलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. मातुःश्री (कै.) हरणाबाई वाघ यांच्या स्मरणार्थ वाघ यांचे चिरंजीव डॉ. सागर वांबोरी गावात वैद्यकीय सेवा पुरवितात. राजकीय व सामाजिक वाटचालीत पत्नी सौ. प्रभावती यांची मिळालेली साथ, भाऊ डॉ. जगन्नाथ व एकनाथ यांचे मिळालेले सहकार्य याचा वाघ यांना सार्थ अभिमान होता. 

ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा... 
पूर्वीचे राजकारण निःस्वार्थी व "मेरिट'चे होते. जाहिराती देऊन व कार्यकर्त्यांना पार्ट्या देऊन निवडून यायचे व नंतर त्याची "वसुली' करण्यासाठी पदाचा पूर्ण कालावधी वापरायचा, अशा प्रकारच्या सध्याच्या राजकारणाचा वाघ यांना उबग आला होता. आमिष दाखवून निवडून येणाऱ्या नेत्यांबद्दल जनतेला आत्मीयता नसल्याने कार्यकर्तेही तळमळीचे व तोलामोलाचे मिळत नाहीत. त्यामुळे सध्याच्या राजकारणात दर्जेदारपणा, निःस्पृहता व पारदर्शकता राहिली नसल्याची खंत त्यांना वाटत असे. नव्या पिढीने शिक्षणातून स्वतःचे ज्ञान वाढवावे व त्या ज्ञानाचा उपयोग तळागाळातील समाजाला प्रगतिपथावर नेण्यासाठी करावा, असे ते नेहमी सांगत.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com