यामुळे पंढरपूर, मोहोळचे शेतकरी आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाची रक्कम तातडीने मिळावी, या मागणीसाठी सोमवारी पंढरपूर व मोहोळ भागातील सुमारे 100 शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाची रक्कम तातडीने मिळावी, या मागणीसाठी सोमवारी पंढरपूर व मोहोळ भागातील सुमारे 100 शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत. आज तीन वाजता सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात भेटीची वेळी दिली आहे, अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक माऊली हळणवर यांनी दिली. 

हेही वाचा : तुम्हाला माहिती आहे का? काळा रंग वापरू नये असे का म्हणतात?

थकीत ऊस बिलाची रक्कम मिळावी

सीताराम महाराज साखर कारखान्याला मागील हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे 25 कोटी रुपयांची एफआरपीची थकीत रक्कम आहे. थकीत ऊस बिलाची रक्कम मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महसूल प्रशासनाने मागील महिन्यात कारखान्याच्या 34 हजार 100 क्विंटल साखरेचा लिलाव करून विक्री केली आहे. साखर विक्रीतून 10 कोटी 57 लाख रुपये प्रशासनाकडे जमा झाले आहेत. दरम्यान, पुणे येथील युनियन बॅंकेने या पैशावर दावा केला आहे. त्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. 
साखर विक्रीतून आलेले पैसे न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडल्याने ऊस उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत उसाचा एक रुपयादेखील मिळाला नसल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. ऊस बिलाची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी, या मागणीचे लेखी निवेदन उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले जाणार आहे. 

हेही वाचा : 'त्यांच्या कष्टाला पुरस्काराचे फळ'

आपले गाऱ्हाणे मांडणार
यासाठी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, संजना घाटे, राष्ट्रीय किसान महासंघाचे अध्यक्ष संदीप गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली उद्या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. या वेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर त्यांच्याशी चर्चा देखील केली जाणार असल्याचे माऊली हळणवर यांनी सांगितले. 
शेतकऱ्यांच्या या शिष्टमंडळात प्रकाश तनपुरे (तारापूर), महादेव गुंड (आष्टी), सज्जन भोसले, धनाजी व्होटे (व्होळे), महादेव आसबे, दत्तात्रय पांढरे, संतोष सोनवणे, पार्थ सुरवसे आदी प्रमुख शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

हेही वाचा : ... दीड वर्षाचा जयदीप आला चाकाखाली!
मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावणी 

साखर विक्रीतून आलेल्या 10 कोटी 57 लाख रुपयांवर पुणे येथील युनियन बॅंकेने दावा दाखल केला आहे. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. यावर दोन सुनावण्या पार पडल्या आहेत. उद्या (सोमवारी) सकाळी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊन निर्णय होण्याची शक्‍यता आहे. उद्या न्यायालयात यावर काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सरकारतर्फे ऍड. गोखले यांनी शेतकऱ्यांची बाजू न्यायालयात मांडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur farmers is today CM visits