पंढरपूरमध्ये मिस फायर; अधिकाऱ्याला लागली गोळी

अभय जोशी
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

पंढरपूर: एका फौजदाराच्या रिव्हॉल्वर मधील गोळी मिस फायर होऊन फौजदाराच्या मांडीत घुसली. ही घटना आज (बुधवार) दुपारी दीडच्या सुमारास येथील शहर पोलिस ठाण्याच्या आवारातील चहा कॅन्टीन जवळ घडली.

पंढरपूर: एका फौजदाराच्या रिव्हॉल्वर मधील गोळी मिस फायर होऊन फौजदाराच्या मांडीत घुसली. ही घटना आज (बुधवार) दुपारी दीडच्या सुमारास येथील शहर पोलिस ठाण्याच्या आवारातील चहा कॅन्टीन जवळ घडली.

या घटने विषयी समजलेली माहिती अशी की, कार्तिकी यात्रेच्या बंदोबस्तासाठी अनेक ठिकाणाहून पोलिस अधिकारी व कर्मचारी आले आहेत. सध्या सांगोला पोलिस ठाण्यात नेमणूकीस असलेले व मूळचे पंढरपूरचे रहिवासी असलेले फौजदार राजेंद्र कदम हे यात्रा बंदोबस्तासाठी आलेले आहेत. आज दुपारी शहर पोलिस ठाण्याच्या आवारातील चहाच्या कॅन्टीन जवळ ते बसलेले असताना त्यांच्या रिव्हॉल्वर मध्ये गोळी अडकली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ती गोळी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ते जमले नाही. त्यांनी मंगळवेढा येथून बंदोबस्तासाठी आलेल्या फौजदार बाळासाहेब जाधव यांच्याकडे त्यांचे रिव्हॉल्वर देऊन त्यांना गोळी काढण्यास सांगितले. श्री. जाधव यांनी रिव्हॉल्वर हातात घेऊन गोळी काढण्याचा प्रयत्न केला असता मिस फायर होऊन ज्यांचे रिव्हॉल्व्हर होते त्या श्री. कदम यांच्याच मांडीत गोळी घुसून ते जखमी झाले. श्री. कदम यांना तातडीने पंढरपूर येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे.

या संदर्भात सहायक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांना विचारले असता ते म्हणाले, मिस फायर झाल्याने ही घटना घडली असून त्याविषयी आवश्‍यक ती पुढील कारवाई केली जात आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pandharpur news Miss Fire; police officer got a shot