सांगलीच्या या दिग्गज नेत्या राष्ट्रवादीच्या वाटेवर?

jayashri patil new
jayashri patil new

सांगली : कॉंग्रेसच्या नेत्या आणि दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांना राष्ट्रवादीकडून मोठी संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांनी हेलिपॅडवर भेट घेतली. मात्र त्यानंतर कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत झालेल्या मिरजेतील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या कार्यक्रमास त्या अनुपस्थित होत्या. यामुळे या चर्चेला अधिक पुष्टी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

गुलाबराव पाटील शिक्षण संस्थेचा कार्यक्रमाला कॉंग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते. मात्र काही अपवाद सोडला तर कॉंग्रेसचे नगरसेवक आणि स्वत: श्रीमती पाटील यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. याच कार्यक्रमात शरद पवार यांनी कॉंग्रेसमधील गटबाजीवर टीकाही केली होती. दरम्यान युवा नेते विशाल पाटील मात्र विदेश दौऱ्यावर असल्याने या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. दरम्यान कॉंग्रेसमधील मदन पाटील यांचा मोठा गट येथे आहे.

पण स्थानिक मोठा आधार नसल्याने कॉंग्रेसची अवस्था बिकट आहे. दोन आमदार आणि मंत्रिपद कॉंग्रेसकडे आहे. सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्यासारखे युवा नेतृत्वदेखील आहे. त्यांच्यामुळे कडेगाव, पलूस, जत येथे कॉंग्रेस भक्‍कम आहे. पण महापालिका क्षेत्रात कॉंग्रेसचे 20 सदस्य असूनही दोन्ही शहरांत पक्ष अजून उभारी घेत नाही. अंतर्गंत वादाने पक्ष पोखरला गेला आहे. मदन पाटील गटाचे नगरसेवकही निराश आहेत. त्यामुळे पक्षातीलच काहींना श्रीमती पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर विचार करावा असा प्रस्ताव ठेवला आहे. त्याला गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर जोर आला आहे. 

जयंत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आणि त्यांना पालकमंत्रिपद मिळाल्यावर श्रीमती जयश्री पाटील यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांसोबत मुंबईत जाऊन त्यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळेपासून श्रीमती पाटील या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्याला काल (गुरुवारी) खासदार शरद पवार यांची त्यांनी भेट घेतल्यामुळे आणखी बळ आले आहे. श्रीमती पाटील यांना विधान परिषदेवर घेऊन राष्ट्रवादी मोठी संधी देणार असल्याचीही चर्चा आहे. 
मुळात राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर वसंतदादा घराण्यातही फूट पडली. वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू हे कॉंग्रेसमध्येच राहिले तर दादांचे पुतणे विष्णूअण्णा राष्ट्रवादीत गेले होते. त्यामुळे मदन पाटीलही राष्ट्रवादीतच राहिले. 2004 च्या निवडणुकीत विधानसभेला मदन पाटील यांना राष्ट्रवादीने डावलल्याने त्यांनी बंड केले. त्यामुळे येथील राष्ट्रवादी भुईसपाट झाली. मदन पाटील आमदार झाले, पुढे कॉंग्रेसचे सहयोगी होऊन मंत्रीही झाले. त्यामुळे राष्ट्रवादी सांगली शहरातून पूर्ण संपुष्टात आली होती. 

मदन पाटील यांच्या निधनानंतर श्रीमती जयश्री पाटील यांनी गेल्या वर्षी झालेली लोकसभा निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची इच्छा होती. पण, त्यांनी नकार दिला. या निवडणुकीत तर ही जागा कॉंग्रेसने सोडून दिली. त्यामुळे विशाल पाटील यांनी स्वाभिमानी पक्षात जाऊन निवडणूक लढवली. पुढे विधानसभेसाठीही दादा घराण्याला डावलून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे खासदारकी व आमदारकी पासून दादा घराणे बाजूला पडले. श्रीमती पाटील राजकारणातून बाजूला होणार का? अशी शंका उपस्थित झाली होती. 
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या साथीने पुन्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आली आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीने आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. खानापुरातील कॉंग्रेस नेते माजी आमदार सदाशिव पाटील यांनी कालच शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता जयश्री पाटील याही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

महापालिका क्षेत्रात अद्याप राष्ट्रवादीला आपले पाय घट्ट रोवता आलेले नाहीत. मदन पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा गट विस्कळित होईल अशी शक्‍यता होती. मात्र हा गट जयश्री पाटील यांच्यासोबतच राहिला आहे. त्यामुळे जयश्री पाटील राष्ट्रवादीत आल्यास महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीला मोठी ताकद मिळणार आहे. हे राजकारण लक्षात घेऊन राष्ट्रवादीने श्रीमती पाटील यांना पक्षात घेण्यास पायघड्या घातल्या आहेत. पण, त्यावरून जयश्री पाटील राष्ट्रवादीत जाणार की कॉंग्रेसमध्येच राहणार हे अजून स्पष्ट नाही. अर्थात त्यांनी असा निर्णय भविष्यात घेतल्यास मदन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे एक वर्तुळ पूर्ण होणार आहे. मात्र राष्ट्रवादीत त्यांनी जाण्यास कॉंग्रेसमधील मदनभाऊंना मानणाऱ्या कट्टर गटाचा मोठा विरोध देखील आहे. या पार्श्‍वभूमीवर सांगलीच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार का नाही, हे लवकरच स्पष्ट होईल! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com