Sangli : पवार कुटुंबीयांनी घेतला धाडसी निर्णय; पतीच्या मृत्यूनंतरही 'ती' आता जगणार सन्मानानं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Woman in Tasgaon Taluka

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढन तिला विद्रूप करणे माणुसकीला शोभत नाही.

Sangli : पवार कुटुंबीयांनी घेतला धाडसी निर्णय; पतीच्या मृत्यूनंतरही 'ती' आता जगणार सन्मानानं!

विसापूर : तासगाव तालुक्यातील (Tasgaon) चिखलगोठण येथे पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे कुंकू पुसले नाही. बांगड्या फोडल्या नाहीत. जोडवीही काढली नाहीत. विशेष म्हणजे कुटुंबातील नातेवाईकांच्या निर्णयामुळे या महिलेला समाजात आता सन्मानाने जगता येणार आहे.

धाडसी व क्रांतिकारी पाऊल टाकणाऱ्या पवार कुटुंबीयांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. संजय (भैय्या) सदाशिव पवार यांचे नुकतेच निधन झाले. पुरोगामी विचारांचा वारसा चालविणारे सदा बापू यांचे ते कनिष्ठ चिरंजीव. उत्तम सूत्रसंचालक, फर्डे वक्ते व सर्वांशी मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव. कुटुंबीयांतच पुरोगामी विचारांचा पगडा होता.

पुरोगामी चळवळ चालवणारे कुटुंब म्हणून ओळख होती. रक्षाविसर्जनाला मृताच्या पत्नीचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे असे प्रकार टाळून कुटुंबातील ज्येष्ठ सुभाष पवार, निवास पवार, ॲड. अरुण पवार, सुधीर पवार यांनीही प्रथा मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस भावकीतील सर्व सदस्यांची बैठक झाली.

नातेवाईकांनाही समजावून सांगण्यात आले. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढन तिला विद्रूप करणे माणुसकीला शोभत नाही. तिला तिच्या जगण्याचा अधिकार आहे तिने सन्मानाने जगले पाहिजे, असे विचार कुटुंबातील सदस्यांनी भावकी समोर मांडले.

अनिष्ट प्रथा बंद करूया, अशी हाक चौघा भावांनी दिली. गावकऱ्यांनी त्याला प्रतिसाद देत प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. एका अनिष्ट प्रथेविरुद्ध क्रांतिकारी पाऊल टाकले. गावाने साथ दिली. अखेर वैधव्य आलेल्या महिलेला सन्मानाने गावात जगता येईल असा निर्णय झाला. त्या निर्णयाचे सर्व माता भगिनींनी स्वागत केले.

टॅग्स :Sangliwomen