उजनी जलाशयात पाणी नव्हे विष..!

उजनी जलाशयात पाणी नव्हे विष..!

केत्तूर (करमाळा) : सोलापूर, पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील जलाशयाच्या पाण्यावर देशी-विदेशी शास्त्रज्ञांनी संशोधन करून हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे वारंवार सांगूनही या पाण्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत काहीही कारवाई न केल्याने या पाण्याचा दूषितपणा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या हे पाणी हिरवेगार झाले असून या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे जलाशयाजवळील गावांतील ग्रामस्थ वैतागले आहेत.

उजनीच्या पाण्याचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या कोंढारचिंचोली (ता. करमाळा)जवळील डिकसळ (ता. इंदापूर) पुलापासून सर्वत्रच पाण्याला हिरवा रंग आला आहे. "पाणी रे पाणी तेरा रंग कैसा?' हे सांगता येत नसले तरी उजनीचे पाणी पाहिल्यानंतर मात्र हे निश्‍चित सांगता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात नदी किनाऱ्याजवळ सकाळी वारे सुटल्यानंतर या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत आहे तर जलाशयात लाटा निर्माण झाल्यावर जलाशयाच्या काठावर या हिरव्या पाण्याला काठावर पांढरा फेसही तयार होत आहे. 

यामुळे पाणी दूषित 
उजनी जलाशयात पुणे जिल्हा व परिसरातील मैला, मूत्र, सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतींमधील खराब केमिकलयुक्त पाणी, खराब केमिकल कोणतीही प्रक्रिया न करता थेट उजनी जलाशयात येत आहे. हे दूषित झालेले पाणी जलाशयाजवळील बहुतांश गावांना पिण्यासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून सोडले जाते. उजनीचे पाणी सध्या "गटारगंगा' झाली आहे. 

जीवितास धोका 
उजनीच्या या दूषित पाण्याचा संपर्क शरीराच्या कुठल्याही भागाला झाल्यास अंगाला खाज सुटत असून अंगाला पुरळही येत आहेत. विशेष म्हणजे, हे दूषित झालेले पाणी जलाशयाच्या काठी बहुतांश गावात तसेच शहरी भागात कोणत्याही प्रक्रियेविना पिण्यासाठी थेट वापरले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. जलाशय काठावरील पशुधनही या दूषित पाण्यामुळे संकटात व धोक्‍यात आले आहे. हे दूषित पाणी पिल्यामुळे जनावरे रोगट होत आहेत. त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे. 

गंभीरतेने पाहण्याची गरज
प्रशासनाने याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. वरचेवर वाढत असलेल्या पाण्याच्या दूषितपणामुळे जलाशयावर येणाऱ्या देशी-विदेशी पक्ष्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 
- कल्याणराव साळुंखे, पक्षीनिरीक्षक, पक्षीतज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com