प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, इतिहासकारांनी आता 'हे' काम करावे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ""इतिहास परिषदेने इतिहासाचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून परिषदेमुळे अनेक अभ्यासक, संशोधक निर्माण झाले. परिषदेतील सर्व जण समर्पित भावनेने काम करतात, त्यामुळे इतिहासातील नवे प्रसंग, घटना वाचकांपर्यंत अभ्यासासाठी पुढे येण्यास मदत होत आहे.'' 

कोल्हापूर - ""जेते व पराजीत यांच्यातील संघर्ष हा इतिहासाचा मुख्य भाग आहे. जेते जो इतिहास लिहितात, तो त्यांचा पराक्रम असतो. भारताचा इतिहास अभिजन व बहुजन यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. नव्या काळात वस्तुनिष्ठ इतिहास लिहिला जावा. सत्यासत्यता तपासून इतिहासाची पुनर्मांडणी होणे काळाची गरज आहे,'' अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज येथे व्यक्‍त केली. महाराष्ट्र इतिहास परिषदेचे राज्यस्तरीय 28 वे अधिवेशन राजर्षी शाहू महाविद्यालयात आज सुरू झाले. या वेळी डॉ. एन. डी. पाटील उद्‌घाटक म्हणून बोलत होते. 

डॉ. पाटील म्हणाले, ""वर्गसंघर्षाच्या काळात अभिजनांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बहुजनांच्या संस्कृतीचा विचार होत नाही; मात्र काही इतिहासकारांनी ज्यांना आवाज नाही अशांना बोलते केले. यापुढे इतिहासकारांनी घडलेल्या घटनांचा अन्वयार्थ लावण्याचे काम करावे.'' 

हेही वाचा - बापरे ! कागल - निढोरी मार्गावर बिबट्याचे दर्शन

परिषदेमुळे अनेक अभ्यासक, संशोधकांना प्रोत्साहन

डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ""इतिहास परिषदेने इतिहासाचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून परिषदेमुळे अनेक अभ्यासक, संशोधक निर्माण झाले. परिषदेतील सर्व जण समर्पित भावनेने काम करतात, त्यामुळे इतिहासातील नवे प्रसंग, घटना वाचकांपर्यंत अभ्यासासाठी पुढे येण्यास मदत होत आहे.'' 

इतिहास घडविणाऱ्यांनी इतिहास लिहिल्याची उदाहरणे

सदानंद मोरे म्हणाले, ""घटनेचे विश्‍लेषण करणे म्हणजे इतिहास मानला जातो. इतिहास घडविणाऱ्यांनी इतिहास लिहिल्याची उदाहरणे आहेत. इतिहासकर्ता, तो घडण्यासाठी परिस्थिती, नियती ही त्रिसूत्री इतिहास लेखनासाठी महत्त्वाची ठरते.'' 
अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक विभागावरील शोधनिबंधांचे वाचन इतिहासाचे संशोधक करणार आहेत. 
प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे, उपप्राचार्य आर. पी. देठे, डॉ. संजय साठे, परिषदेचे समन्वयक आर. सी. पाटील, प्रा. समाधान जाधव यांनी संयोजन सहभाग घेतला. 

हेही वाचा - सुखद ! निराधार आजीला मिळाले घर, अन् नात.. 

पुरस्कार वितरण 

अधिवेशनात इतिहास विषयात तसेच प्रशासकीय विषयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले. यात पंडित सेतूमाधवराव पगडी पुरस्कार सु. ग. जोशी यांना, इतिहासभूषण वा. सी. बेंद्रे पुरस्कार डॉ. ज. प्र. जामखेडकर यांना, तर डॉ. आप्पासाहेब पवार पुरस्कार डॉ. विवेक सावंत यांना प्रदान केला. मानचिन्ह, ग्रंथ, उपरणे व कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरूप होते. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prof Dr N D Patil Comment In Kolhapur History Conference