शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार घोडचूकच ठरेल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 December 2019

डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विद्यापाठीचा नामविस्तार करू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. यावेळी डॉ. पाटील यांनी विद्यापीठाच्या नामकरणाचा इतिहासच सर्वांसमोर मांडला.

कोल्हापूर - ‘शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली, त्याचवेळी त्याचे नामकरण करताना सर्व बाजूंचा विचार करून करण्यात आला होता. राज्याचे पहिले मुख्यमंत्री (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी फार विचाराअंती हा निर्णय घेतला होता. आता विद्यापीठाचा नामविस्तार करणे म्हणजे ती घोडचूकच ठरेल,’ असा इशारा ज्येष्ठ नेते डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांनी येथे दिला. 

डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विद्यापाठीचा नामविस्तार करू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. यावेळी डॉ. पाटील यांनी विद्यापीठाच्या नामकरणाचा इतिहासच सर्वांसमोर मांडला. याबाबत आमची भूमिका स्वच्छ आहे. हा वाद इथेच मिटला तर याच्याइतके समाधान नाही. ज्यांनी प्रस्ताव सुचवला, ज्यांनी पाठपुरावा केला, त्यांना एक विनंती आहे की त्यांनी हा प्रश्‍न वादाच्या भोवऱ्यात आणू नये, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले. 

विचार करूनच विद्यापीठाचे नाव ठरले

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘या प्रश्‍नावर यापूर्वी चर्चा झालीच नाही, असे नाही. जाहीररीत्या यावर चर्चा झाली आहे. विद्यापीठ स्थापन करायचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यासाठी मान्यवर शिक्षण तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्या समितीच्या अहवालानुसार विद्यापीठाचे नाव दिले गेले. साहजिकच त्यावेळी शिवाजी महाराजांच्या नावे विद्यापीठ होत आहे म्हटल्यावर त्याचे नामकरण छत्रपती शिवाजी असे व्हावे, अशा प्रतिक्रिया आल्या. त्याचेही जाहीर उत्तर त्या समितीने दिले. सरकारनेही आपले म्हणणे दिले. जो युक्तिवाद आम्ही आज करतोय, तो त्यावेळीही झाला आहे. पूर्ण विचारांती हा निर्णय झालेला आहे. यावर लोकांनी फारसा वाद घालू नये.’’

हेही वाचा - छेडछाडीतून इचलकरंजी येथे तरुणाचा निर्घृण खून

संक्षिप्तीकरणामुळे मूळ नावच गायब

ते म्हणाले, ‘‘विद्यापीठाचा नामविस्तार झाला, तर ज्यांच्या नावे विद्यापीठ आहे, त्यांचेच नाव गायब होते. मुख्यमंत्री असतील किंवा खासदार संभाजीराजे यांचा आदर ठेवून मी बोलतो, त्यांची विचारसरणी जी आहे, त्याला विरोध असण्याचा संबंध नाही; पण नाव देताना जी कारणे दिली होती, ती आजही आहेत. विद्यापीठ स्थापन करायचा निर्णय ज्यावेळी निश्‍चित झाला, त्यावेळी काही लोकांना यशवंतराव चव्हाण यांनी काही लोकांना बोलवून घेतले, त्यात मी सुद्धा होतो. त्या बैठकीतच (कै.) चव्हाण यांनीच या प्रश्‍नावर वाद न करण्याचे आवाहन केले होते. देशात ज्या महान व्यक्तींच्या नावे विद्यापीठ किंवा संस्था आहेत, त्याचे संक्षिप्तीकरण झालेले आहे. त्यातून मूळ नावच गायब झाले आहे. तसा प्रकार शिवाजी विद्यापीठाच्या बाबतीत होऊ नये, ही आमची भूमिका आहे. म्हणून विद्यापीठाचा नामविस्तार करू नये, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.’’

हेही वाचा - धक्कादायक ! चोर सोडून संन्याशाला बेड्या

दिग्गजांकडूनच नाव निश्चिती

प्रा. डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘‘ज्यांनी हा प्रश्‍न निर्माण केला, त्यांच्याही मनात शिवाजी महाराजांविषयी आदर आहे, तसा आम्हालाही आहे. कितीतरी उदाहरणे देता येतील, त्यात संक्षिप्तीकरणामुळे नाव गायब झाले आहे. दिग्गज लोकांनी एकत्र येऊन हे नाव दिले आहे. (कै.) चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या दिग्गजांनी शिवाजी विद्यापीठच नाव ठेवले. विश्‍वविद्यालयही न करता विद्यापीठ असेच नाव ठेवले. हेच नाव कायम रहावे.’’ शिष्टमंडळात प्रा. सदानंद मोरे, प्रा. किसन कुराडे, वसंतराव मुळीक, संभाजीराव जगदाळे, प्रा. टी. एस. पाटील, कादर मलबारी, गणी आजरेकर, कोल्हापूर-गोवा बार असोशिएशनचे सदस्य ॲड. विवेक घाटगे, ॲड. गुलाबराव घोरपडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, दिलीप पवार, रमेश मोरे, अशोक पोवार, प्रा. मधुकर पाटील, उदय धारवाडे, ॲड. पंडितराव सडोलीकर, बबन रानगे आदींचा समावेश होता.

हेही वाचा - शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची ही भूमिका 

त्यांच्या हेतूबद्दल शंका नाही

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व मोठे आहे; पण विद्यापीठाचे नाव ठेवताना १९६२ मध्ये जो विचार झाला होता, त्याचाही अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. ज्यांनी नामविस्ताराची मागणी केली, त्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह त्याचा पाठपुरावा करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हेतूविषयी आम्हाला अजिबात शंका नाही; पण आमच्याही मागणीचा विचार व्हावा, अशी अपेक्षा डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.

...तर माझी चूक ठरेल

कोल्हापुरात विद्यापीठाची स्थापना झाली. त्या घटनेचा मी साक्षीदार आहे. एवढेच नव्हे, तर कुलगुरुंना सल्ला देण्यासाठी जी समिती नेमली होती, त्याचा सदस्यही मी होतो. विद्यापीठाचे नाव हे पूर्वसुरींनी अतिशय विचारपूर्वक ठरवले आहे. त्यात बदल होत असेल आणि मी गप्प बसलो, तर ती माझी मोठी चूक ठरेल. म्हणूनच ही मागणी मान्य न करता विद्यापीठाचे आहे ते नाव कायम राहावे, यासाठी इथंपर्यंत आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prof N D Patil Opposes To Change Shivaji University Name