शंभूराजसाहेब, पोलिसांचं तेवढं होऊन जाऊद्या

विशाल पाटील 
बुधवार, 8 जानेवारी 2020

(कै.) आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना 2014 मध्ये सातारा जिल्ह्यात शाहूपुरी आणि शिरवळ ही दोन नवी पोलिस ठाणी मंजूर झाली होती. त्यानंतर मात्र, अद्यापही कोणत्याच पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळाली नाही. 

सातारा : वाढती लोकसंख्या, त्याबरोबरीने गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, पोलिस ठाण्यांवरील वाढता ताण याबाबी लक्षात घेतल्या, तर जिल्ह्यातील सध्याची 30 पोलिस ठाणी अपुरी पडत आहेत. नव्याने आणखी दहा पोलिस ठाणी निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलिस दल वर्षानुवर्षे प्रस्ताव पाठवत आहे. मात्र, त्याला अद्याप मूर्त रूप आले नाही. शंभूराज देसाई यांच्या रूपाने सातारा जिल्ह्यास गृह (ग्रामीण) राज्यमंत्रिपद मिळाले असून, 2014 नंतर हा विषय पुन्हा एकदा मार्गी लागेल, अशी आशा पोलिस दलाला आहे. 

हे वाचा - वीरपत्नीला मोबाईलपासून ठेवलेले दूर

जिल्ह्यातील पोलिस बळ अधिक सक्षम करण्यासाठी आणि वाढते गुन्हे रोखण्यासाठी नवीन पोलिस ठाण्यांची नितांत आवश्‍यकता आहे. सातारा शहर पोलिस ठाण्याचे विभाजन करावे, असे 1992 मध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांना जाणवले होते. राज्यात सर्वाधिक "क्राइम रेट' असलेले सातारा शहर पोलिस ठाणे अशी नोंद झाली होती. शहर पोलिस ठाण्याची हद्द मोठी असल्याने गुन्हे नोंद होण्याचे प्रमाण लक्षणीय होते. (कै.) आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना 2014 मध्ये सातारा जिल्ह्यात शाहूपुरी आणि शिरवळ ही दोन नवी पोलिस ठाणी मंजूर झाली होती. त्यानंतर मात्र, अद्यापही कोणत्याच पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळाली नाही. 

हेही वाचा - महाबळेश्वर : लाॅडविक पाॅईंटवरील ताे मृतदेह पुण्यातील व्यक्तीचा

कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याची हद्द खूप मोठी असून, येथे घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्याही जादा आहे. शाळा, महाविद्यालये, वाढलेली वसाहत, गुन्हेगारी या पार्श्‍वभूमीवर मलकापूर, विद्यानगर येथेही ठाणी होणे आवश्‍यक आहे. पाटण, कोरेगाव तालुके विस्ताराने मोठे असल्याने जनतेच्या सोयीसाठी तेथेही विभाजन होणे नितांत आवश्‍यकता आहे. तापोळा हे मेढ्यापासून लांब असून, ते पर्यटन स्थळ आहे. लोणंद ठाणे, फलटण ग्रामीण ठाण्याचा अतिरिक्‍त ताण कमी करण्यासाठी सुरवडीत ठाणे होणे आवश्‍यक बनले आहे. 

आणखी वाचा - दाेन हजार रुपये घेताना पाेलिसाला पकडले

...हे होतील फायदे 

कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल 
पोलिसांवरील अतिरिक्‍त ताण कमी होईल 
जादा मनुष्य बळामुळे तपास मार्गी लागतील 
अवैध धंदे, चोऱ्या, मारामारीवर टाच येईल 
चोर, गुंडांवर जरब बसविणे शक्‍य होईल 
नागरिकांना सोयीच्या अंतरावर ठाणे उपलब्ध होईल 
घटनास्थळी तत्काळ पोचणे पोलिसांनी शक्‍य होईल 

आवश्‍‍य वाचा - लयभारी; पोलिस मैदानावर महिलाराज

प्रस्तावित पोलिस ठाणी... 

या ठाण्यांचे विभाजन ही नवीन ठाणे 
सातारा शहर एमआयडीसी 
कऱ्हाड शहर मलकापूर 
कऱ्हाड शहर विद्यानगर 
कऱ्हाड तालुका नांदगाव
उंब्रज मसूर 
पाटण मल्हारपेठ
कोरेगाव सातारारोड
वडूज मायणी
मेढा तापोळा 
फलटण ग्रामीण व लोणंद सुरवडी 

वाचा - धक्कादायक...! अक्कलकोटमध्ये पोलिसानेच केली चोरी

...असे हवे मनुष्य बळ 

पोलिस निरीक्षक 10 
सहायक निरीक्षक 14
उपनिरीक्षक 26
सहायक फौजदार 54
हवालदार 104
नाईक 161
शिपाई 315
एकूण 684 

""प्रस्तावित पोलिस ठाण्यांबद्दल सविस्तर माहिती घेऊन पुढील आठवड्यात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार आहे. त्यामध्ये माहिती घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून प्रस्तावित पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.'' 
- शंभूराज देसाई
गृह राज्यमंत्री (ग्रामीण) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal for Ten New Police Stations In Satara District Submitted To the Maharashtra State Government For approval