प्रशांत गडाख म्हणतात, "कथार्थ सुभाषितम्‌'मुळे मुलांना संस्कृत व मराठीचा लळा

"Publication of the book" Katharth Subhashitam
"Publication of the book" Katharth Subhashitam

नगर : ""संस्कृत सुभाषितांना गोष्टीरूपाने मराठी भाषेत घेऊन आलेल्या "कथार्थ सुभाषितम्‌' पुस्तकामुळे शालेय विद्यार्थ्यांना संस्कृत व मराठीचा लळा लागेल,'' असा विश्‍वास नगर जिल्ह्यातील सोनई (ता. नेवासे) येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष व युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांनी व्यक्त केला. 

कुर्ला परिसरातील पल्लवी फाउंडेशनच्या पुढाकाराने प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापिका विशाखा परब यांनी लिहिलेल्या "कथार्थ सुभाषितम्‌' पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी गडाख पाटील बोलत होते. "सकाळ'च्या नगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पल्लवी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, विश्‍वस्त शलाका कोरगावकर, "रात्रीस खेळ चाले'फेम काशी ऊर्फ सचिन शिर्के, "अनमोल' प्रकाशनचे नरेंद्र व सोनाली नांदूरकर, पुस्तकाच्या लेखिका विशाखा परब, व्याख्याते गणेश शिंदे, कवी संजीव तनपुरे, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त रविकिरण पराडकर, मुंबई हाय वर्ल्ड स्कूलच्या अधिष्ठाता अरुंधती निकम आदी व्यासपीठावर होते. 

गडाख पाटील म्हणाले, ""मुंबईसारख्या शहरात मराठी संस्कृती व भाषा जपण्याचे काम भाऊ कोरगावकर व त्यांची "टीम' करीत असल्याचा आपल्याला अभिमान आहे. आपल्या शाळेतील शिक्षकांमधील गुण हेरून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम भाऊ करीत आहेत. देवभाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या; परंतु सध्या लोप पावत चाललेल्या संस्कृत भाषेतील सुंदर अनेक सुभाषितांचा कथेच्या माध्यमातून सोपा मराठी अर्थ "कथार्थ सुभाषितम्‌'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहजपणे उमगणार आहे.'' 

डॉ. बोठे पाटील यांनी वाचनाचे महत्त्व विशद करीत, अशा पुस्तकांची सध्या आत्यंतिक गरज असल्याचे स्पष्ट केले. भाऊ कोरगावकर यांचे संघटनकौशल्य व आपल्या संस्थेतील सहकाऱ्यांवर मनापासून प्रेम करण्याच्या वृत्तीचे त्यांनी कौतुक केले. लेखिका विशाखा परब यांनी पुस्तकाच्या लेखनाचा हेतू विशद करून, भाऊ कोरगावकर यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे शक्‍य झाल्याचे सांगितले. प्रकाशक सोनाली नांदूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. 

लघुपटाचे प्रदर्शन भावले

कार्यक्रमाची सुरवात संदीप कदम आणि त्यांचे शिष्य रविराज अडसूळ यांच्या बहारदार तबला जुगलबंदीने झाली. त्यानंतर प्रबोधन कुर्ला शाळेतील मुला-मुलींचे सुंदर गीत सादर झाले. भाऊ कोरगावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, मराठी भाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या "मायबोली' या पल्लवी फाउंडेशनच्या, वास्तवाचा आरसा दाखविणाऱ्या लघुपटाचे प्रदर्शन उपस्थितांना भावले. भाऊ व शलाका कोरगावकर यांच्या संकल्पनेतून "बालभारती'च्या पुस्तकातील जुन्या व विस्मरणात गेलेल्या अनेक कवितांचे सादरीकरण करण्यात आले. त्यासाठी संगीतकार राज पैठणकर यांनी संगीताची साथ दिली. 

कवितांनी रसिकांची मने जिंकली

शुभांगी मेमाणे, ऍड. नयना परदेशी व प्रसिद्ध गायिका अंजली तळेकर यांनी या कविता सादर केल्या. नगरचे कवी संजीव तनपुरे यांच्या "झाड' व "आकार साकार पांडुरंग' या कवितांनी रसिकांची मने जिंकली. पराडकर यांनी मराठी भाषेवरची मनाला भिडणारी कविता सादर केली. ऍड. नयना परदेशी यांचे खुसखुशीत निवेदन कार्यक्रमाची रंगत वाढविणारे होते. 

व्यासपीठावरच खरेदी केली पुस्तकाची पहिली प्रत! 

ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख पाटील यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांनी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाच्या "गाव तेथे वाचनालय' यासह अन्य उपक्रमांची माहिती सांगितली. आपल्या वडिलांनी कोणत्याही प्रकाशन समारंभाला गेले, की पहिली प्रत विकत घेण्याची परंपरा जपल्याचे सांगितले. आपणही ही परंपरा पुढे चालवीत असल्याचे सांगून त्यांनी व्यासपीठावरच पुस्तकाची पहिली प्रत लेखिका, प्रकाशक व कोरगावकर यांच्याकडून विकत घेतली. याशिवाय नेवासे तालुक्‍यातील "गाव तेथे वाचनालय' उपक्रमासाठी "कथार्थ सुभाषितम्‌' या पुस्तकाच्या 500 प्रती विकत घेण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com