राजाराम साखर कारखाना अध्यक्षपदासाठी 'यांचे' नाव आघाडीवर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

श्री. चौगले 20 वर्षे संचालक मंडळात आहेत. पहिली दहा वर्षे त्यांच्या पत्नी संचालक होत्या, तर दहा वर्षांपासून ते स्वतः संचालक आहेत. गेल्यावर्षी त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मार्च 2020 मध्ये संपते. 

कोल्हापूर - येथील छत्रपती राजाराम कारखान्याचे अध्यक्ष हरिश नारायण चौगले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ठरलेला कार्यकाल पूर्ण झाल्याने श्री. चौगले यांनी मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. दोन दिवसांत संचालकांच्या बैठकीत तो मंजूर होईल. 

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष बदलाच्या घडामोडी सुरू आहेत. आठ-दहा दिवसांत नव्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. ज्येष्ठ संचालक सर्जेराव माने यांची या पदावरील निवड निश्‍चित समजली जाते. 

श्री. चौगले 20 वर्षे संचालक मंडळात आहेत. पहिली दहा वर्षे त्यांच्या पत्नी संचालक होत्या, तर दहा वर्षांपासून ते स्वतः संचालक आहेत. गेल्यावर्षी त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मार्च 2020 मध्ये संपते. 

आगामी निवडणुकीत सतेज पाटील यांचे आव्हान

आगामी निवडणुकीतही सत्तारूढ गटासमोर आमदार सतेज पाटील यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे निवडणूकही चुरशीची होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखाना ताब्यात घेण्याचे प्रयत्न श्री. पाटील यांचे असतील, तर त्यांना रोखण्यासाठी श्री. महाडिक यांनी आतापासूनच व्यूहरचना तयार केली आहे. अध्यक्ष चौगले यांचा राजीनामा हा त्याचाच एक भाग आहे. अनेक वर्षे संचालक असलेल्या श्री. माने यांना या पदावर बसवून निवडणूक सोपी करण्याचा प्रयत्न श्री. महाडिक यांचा असेल. कारण, श्री. माने हातकणंगले तालुक्‍यातील संचालक आहेत आणि या तालुक्‍यात कारखान्याचे सर्वाधिक चार ते साडेचार हजार मतदार सभासद आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajaram Sugar Factory President Election Kolhapur News