कावळा म्हणतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांच्या झाड संमेलनाची संकल्पना यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका ज्योती ढमाळ, पद्मावती शिंदे, माधुरी भोईटे, आशा वाघमोडे, वर्षा भोसले, सोनाली गाडे, वृषाली पाटील, प्रियांका पवार, विजय माने आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

सातारा ः विद्यार्थ्यांवर पर्यावरण संवर्धनाचे दृढ संस्कार व्हावेत, त्यांना निसर्गाबाबतचे प्रेम वाढावे, यासाठी येथील रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिरात विद्यार्थ्यांनी वडाच्या झाडाखाली अनोखे झाड संमेलन साजरे केले. साडेतीनशे विद्यार्थी सहभागी झालेल्या या संमेलनात ठराव करून वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा केली. रयत शिक्षण संस्थेची रा. ब. काळे प्राथमिक शाळा ही उपक्रमशील शाळा आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी शाळेतील शिक्षक सातत्याने वेगळे उपक्रम राबवत असतात. विद्यार्थ्यांमध्ये काळाची गरज असलेले पर्यावरण प्रेम वाढावे, यासाठी अनोखे झाड संमेलन नुकतेच आयोजित केले होते.

धनणीच्या बागेत बहरलेल्या विशाल वटवृक्षाखाली हे संमेलन झाले. ते झाड हेच संमेलनाचे अध्यक्ष होते, तर विद्यार्थी झाडांप्रमाणेच मनोगत व्यक्त करत होते. अगदी पहिलीपासून नववीपर्यंतच्या सुमारे साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी झाडाबद्दल आपले विचार मांडले. छोट्या विद्यार्थ्यांनी मोठ्यांप्रमाणे पर्यावरण संतुलन बिघडण्यामुळे होणारे दुष्परिणाम व्यक्त केले, तसेच वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा घेतली. त्यामध्ये शाहू बोर्डिंगमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांचा समावेश होता. केवळ झाडे लावून थांबून चालणार नाही, तर त्याची जोपासना करण्याचा ठराव या बालगोपाळांनी मांडला. झाड संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वडाच्या झाडाभोवती "झाडे लावा, झाडे जगवा', "एक मूल, एक झाड', "कावळा म्हणतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव' अशा घोषवाक्‍यांचे फलक लावले होते. या वेळी काही मुलांनी विविध पक्ष्यांचे आवाजदेखील काढून दाखवले. शालेय विद्यार्थ्यांनी राबवविलेल्या या अनोख्या झाड संमेलनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांच्या झाड संमेलनाची संकल्पना यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका ज्योती ढमाळ, पद्मावती शिंदे, माधुरी भोईटे, आशा वाघमोडे, वर्षा भोसले, सोनाली गाडे, वृषाली पाटील, प्रियांका पवार, विजय माने आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

अवश्य वाचा :  ...म्हणून अतिक्रमण कारवाईत हवालदाराने लावली जीवाची बाजी

हेही वाचा : बाटली जिंकली... महिला निराश !

वाचा : चर्चाच चर्चा : विद्यार्थीनीशी लगट दाेन शिक्षकांच्या अंगलट

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: R.B.Kale School Conducted Tree Samelan In Satara