समरजित यांचे शेट्टींसोबत स्नेहभोजन 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व "शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत स्नेहभोजन केले.

कोल्हापूर ः महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व "शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत स्नेहभोजन केले. श्री. घाटगे यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला या दोन नेत्यांत काल (ता. 18) रात्री दिर्घ चर्चा झाली. चर्चेच्या केंद्रस्थानी शेतकरी प्रश्‍न, कर्जमाफी आदी विषय होते. 

हे पण वाचा - सिमावाशीयांनी शरद पवारांकडे केल्या या मागण्या... 

गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपावर नाराज असलेल्या श्री. शेट्टी यांनी दोन्ही कॉंग्रेसला साथ दिली. लोकसभेत स्वतः श्री. शेट्टी यांचा पराभव झाला पण विधानसभेतही त्यांच्या पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. मात्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात कृषिमंत्री पदासाठी श्री. शेट्टी यांचे नांव चर्चेत होते. पण त्यांच्या पक्षाला मंत्रीमंडळातच नव्हे तर मंत्रीमंडळाच्या शपथविधीलाही निमंत्रण दिले नाही. त्यातून श्री. शेट्टी यांनी उघड नाराजीही व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर श्री. शेट्टी यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. घाटगे यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. नागाळा पार्क येथील श्री. घाटगे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. त्यानंतर या दोघांनी एकत्रित स्नेहभोजनही केले. या भेटीत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि अडचणी, राज्यातील सध्याचे साखर कारखानदारीतील प्रश्न, सध्याची राजकीय परिस्थिती, शासनाने जाहीर केलेली अन्यायकारक व फसवी कर्जमाफी, वीज दरवाढ या विषयावर तासभर चर्चा झाली. शेतकऱ्यांना निवडणुकीआधी जाहीर केलेली कर्जमाफी मिळावी व त्यांना सातबारा कोरा करून मिळावा यासाठी श्री. घाटगे यांनी अलिकडेच आंदोलन केले होते. त्याला श्री. शेट्टी यांनी पाठिंबा दिला. 

हे पण वाचा - झाेपेतच तिघा मायलेकावर केले सपासप वार आणि... 

शेट्टींना सोबत घेऊन काम करू : घाटगे 
माझे वडील विक्रमसिंह घाटगे व शेट्टी यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शेतकरी प्रश्नावर दोघांची भूमिका व दिशा एकच होती. म्हणुनच शेट्टी यांची भेट घेऊन माझ्या कार्याचा केंद्राबिंदू असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बरोबरीने काम करूया म्हणून त्यांना विनंती केली. श्री. शेट्टी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक ताकदीने मी लढू शकेन हे निश्‍चित, अशी प्रतिक्रिया समरजितसिंह यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samarjeet ghatge meet to raju shetty