esakal | सांगली: भाजप हाच काँग्रेसचा मुख्य विरोधक
sakal

बोलून बातमी शोधा

Congress-BJP

सांगली: भाजप हाच काँग्रेसचा मुख्य विरोधक

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : काँग्रेसचा पारंपारिक विरोधक कोण? या प्रश्‍नाचे उत्तर सांगायला राजकारणातील जाणकाराची गरज नाही. भाजप हाच काँग्रेसचा पारंपारिक व मुख्य विरोधक आहे. पण, राजकारणात कोण, कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे म्हणतात. कुठे-कुठे असे राजकीय डाव टाकले जातात की जाणकार, विश्‍लेषकही डोक्याला हात लावतात.

हेही वाचा: 'परिक्रमेत कोणताही अडथळा येणार नाही; भुमिका वाडीतच जाहीर करु'

असाच प्रकार सन २००९ साली सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होती आणि भाजपचा उमेदवार विजयी व्हावा म्हणून चक्क संपूर्ण तालुका काँग्रेस विसर्जित करण्यात आली होती. सर्व काँग्रेस नेते भाजप उमेदवाराच्या प्रचारात उतरले होते.

सध्या जत तालुक्यात भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप विरुद्ध काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्यातील राजकारण पेटले आहे. जगताप यांनी सावंत यांच्यावर आरोप केले आहेत. पोलिस दबावात आहेत, नाहक गुन्हे दाखल करत आहेत, असा आरोप करत त्यांनी आंदोलन केले आहे. हेच जगताप २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. भाजपची उमेदवारी प्रकाश शेंडगे यांना मिळाली होती.

हेही वाचा: कोल्हापूर - पोलिसांची नजर चुकवत 2 पुरग्रस्तांचा जलसमाधीचा प्रयत्न

त्यावेळी जगताप यांना काँग्रेसची ताकद मिळाली असती तर निवडणूक सोपी झाली असती, मात्र काँग्रेसने आघाडी तोडलीच, शिवाय संपूर्ण पक्ष विसर्जित करून टाकला. सगळी टीम शेंडगे यांच्या प्रचारात उतरली. जगताप एकाकी पडले. त्यांना लढा उभा करणे कठीण गेले. काँग्रेसच्या मदतीने भाजपने ती निवडणूक जिंकली.

इथले राजकारण एवढ्यावर संपत नाही. गंमत म्हणजे जगताप यांना पराभूत करून, आमदार झालेल्या शेंडगे यांचे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापले गेले आणि भाजपचे उमेदवार विलासराव जगताप झाले. त्यावेळी जगताप जिंकले, आमदार झाले. पुढे २०१९ ला काँग्रेसने इथली जागा आपल्याकडे घेतली आणि जगतापांना २००९ साली पराभूत करण्याची स्क्रीप्ट लिहणारे काँग्रेसचे विक्रम सावंत आमदार झाले. आता या दोन नेत्यांत थेट संघर्ष सुरु आहे.

हेही वाचा: Raju Shetti Parikrama - पंचगंगेचे लोखंडी कठडे दोराने केले बंदिस्त

यापेक्षा मोठी गंमत म्हणजे, राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी वातावरण तापलेले असताना जत तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. इथे काँग्रेस बाजूला आहे. भाजपला मदत करण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर काँग्रेसने गेल्या महिन्यात जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

परंतू, त्यात काही सुधारणा झालेली नाही. आता खरी गंमत अशी, की सध्या भाजपमध्ये असलेल्या माजी आमदार विलासराव जगताप यांनी राष्ट्रवादीत यावे म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गळ टाकला आहे. इथले राजकारण सोपे नक्कीच नाही. इथे पाण्याचा दुष्काळ आहे, मात्र राजकारणात विषय फार खोल असतो.

loading image
go to top