बिगुल वाजलं! ..अखेर महापालिकेची पोटनिवडणूक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

या जागेसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला.

बिगुल वाजलं! ..अखेर महापालिकेची पोटनिवडणूक जाहीर

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या प्रभाग सोळा 'अ' च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २९ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज सांगली महापालिकेसह धुळे, अहमदनगर आणि नांदेड-वाघाळा या महापालिकेतील रिक्त जागासाठीही पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सांगली शहरातील प्रभाग १६ 'अ' मधून काँग्रेसचे माजी महापौर हारून शिकलगार निवडून आले होते. गतवर्षी त्यांचे निधन झाले. त्यामुळे सोळा 'अ' ची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला.

ही पोटनिवडणूक यंदा जानेवारीत होणे अपेक्षित होते. मात्र कोंरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ती लांबली. अखेर या महिन्यात निवडणूक आयोगाने पोट निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरु केल्या. गेल्या आठवड्यात प्रभाग १६ ची अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली. तर मंगळवारी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी अंतिम करण्यात आली.

हेही वाचा: जनता दलामुळेच 'मॅजिक फिगर' ओलांडली - सतेज पाटील

महापालिकेची सन २०१८ मध्ये निवडणुक झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे २० सदस्य निवडून आले होते. त्यावेळी मिरजेतील आणि सांगलीवाडीतील दोन प्रभाग वगळता उर्वरित १८ प्रभाग हे प्रत्येकी चार उमेदवारांचे होते. त्यामुळे प्रभाग १६ मधून काँग्रेसचे हारून शिकलगार आणि उत्तम साखळकर निवडून आले होते. तर भाजपच्या स्वाती शिंदे आणि सुनंदा राऊत या महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या. गतवर्षी हारून शिकलगार यांचे निधन झाले. त्यामुळे गेले वर्षभर ही जागा रिक्त आहे. या जागेसाठी आता पुढील महिन्यात पोटनिवडणूक होत आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम

  • अर्ज दाखल करण्याचा दिनांक : २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर

  • उमेदवारी अर्ज दाखल करणे.

  • अर्ज छाननी : ७ डिसेंबरला

  • उमेदवारी मागे घेण्याची मुदत : ९ डिसेंबरपर्यंत

  • अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी : १० डिसेंबरला

  • मतदान : २१ डिसेंबर. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

  • मतमोजणी : २२ डिसेंबर रोजी

प्रभाग १६ साठी आचार संहिता

महापालिकेच्या प्रभाग १६ 'अ' ची पोटनिवडणूक आज जाहीर झाल्याने या प्रभागासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचार संहिता केवळ पोटनिवडणूक जाहीर झालेल्या एकाच प्रभागासाठी असून उर्वरित महापालिका क्षेत्रात विकास कामे सुरू राहणार आहेत असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

"पक्षाने आम्हाला निवडणूक लढवण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार महापालिकेची प्रभाग सोळाची पोट निवडणूक आम्ही लढणार आहोत. त्यासाठी योग्य उमेदवार देऊ."

- श्री. दिपक शिंदे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष.

loading image
go to top