सांगली : साखर निर्यात बंदीने चिंतेचे वातावरण

केंद्राची निर्यातीस परवानगी आवश्‍यक; बाजारातील दर पडण्याची भीती गैरसमजातून
sugar exports
sugar exports Sakal

सांगली : यंदाच्या हंगामात साखर निर्यातीला पूर्ण बंदी घातली नसून, यापुढे निर्यात करायची झाल्यास त्याला परवानगी आवश्‍यक आहे. गेल्या वर्षी कोणालाही, कितीही साखर निर्यात करता येत होती; त्यात ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने भारतीय साखरेला परदेशात मागणी वाढली आहे. परिणामी, यावर्षी जास्त साखर निर्यात झाली आहे. साखर निर्यातबंदीच्या निर्णयामुळे देशांतर्गत साखरसाठा व दरावर फारसा परिणाम होणार नाही, असे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने २४ मे रोजी काढलेल्या साखर निर्यातबंदीच्या आदेशामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

केंद्र सरकारने यावर्षी २८ लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट ठेवल्याने अजूनही २८ लाख टन साखर निर्यात होऊ शकते. तत्पूर्वीच केंद्र सरकारने आदेश काढून निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला. त्यात निर्यातीला पूर्णपणे बंदी घातलेली नाही, तर निर्यात करणाऱ्या कारखान्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्‍यक विहीत नमुन्यातील अर्जही सरकारने सोबत जोडला आहे. सरकारच्या आदेशानुसार १ जूनपासून ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत साखर निर्यातीसाठी ऑनलाइन पद्धतीने सरकारची परवानगी घेणे आवश्यक केले आहे. देशातून कच्ची, प्रक्रिया केलेली, पांढरी मिळून १०० लाख टन साखर निर्यातीला वाव दिला आहे. आतापर्यंत ९० लाख टनाचे निर्यात करार झाले असून ८२ लाख टन निर्यात झाली

बंदरातून वाहतूक चालूच आहे. पावसाळ्यात साखर खराब होण्याचा धोका असल्याने निर्यात जवळजवळ ठप्प होते. त्यामुळे मधल्या काळात १०० लाख टनाचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. आतापर्यंत सर्वाधिक निर्यात झाली असून ते देशांतर्गत साखर दर व शेतकऱ्यांसाठी फायद्याचे झाले आहे. भारतात चालू हंगामात ३५५ लाख टनाचे बंपर उत्पादन झाले आहे. सरकारने ६२ लाख टनाचा साठा करण्याचे ठरवले असून देशांतर्गत मासिक खप सरासरी २३ लाख टन आहे. चालू वर्षी देशात २७८ लाख टन साखर खपेल, असा अनुमान आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या सणासुदीला साखर दर अव्वाच्या सव्वा वाढू नयेत म्हणून सरकार काळजी घेत असल्याचे म्हटले आहे.

बंदी नव्हे; िनयंत्रण...

वेस्टर्न इंडियन शुगर मिल असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्राचा २४ मे रोजीच्या आदेशात, साखर निर्यात बंदी नसून, निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा हा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. या आदेशाबाबत विनाकारण गैरसमज झाल्याचे त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

गेल्या पाच वर्षांची निर्यात अशी

सन टनात

२०१७ २५,४४,०००

२०१८ १७,५४,०००

२०१९ ३९,९०,०००

२०२० ५७,९०,०००

२०२१ ७५,१८,०००

यंदा देशातील २५५ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले असून, शेतकऱ्यांची ८४ टक्के ऊसबिले मिळाली आहेत. सध्या जागतिक बाजारात व देशांतर्गत साखरेच्या दरात फारशी तफावत नाही. देशात प्रतिक्विंटल साखरेचा ठोक दर ३१५० ते ३५०० रुपये, तर घाऊक दर ३६ ते ४४ रुपये किलो आहे. हे पाहता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातीविषयी चिंता करण्याचे कारण नाही.

- संजय कोले, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, सांगली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com