Sangli: एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर पेटवले

इस्लामपूर : एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीसाठीच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. गुरुवारी रात्री ऊस वाहतूक करणारे राजारामबापू, क्रांती साखर कारखान्याचे ट्रॅक्टर पेटविण्यात आले. विश्वास साखर कारखान्याचा ट्रॅक्टरही पेटविण्याचा प्रयत्न झाला. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

राजारामबापू कारखान्याचे सर्वेसर्वा पालकमंत्री जयंत पाटील आहेत. क्रांती कारखान्याचे आमदार अरुण लाड; तर विश्वास कारखान्याचे आमदार मानसिंग नाईक अध्यक्ष आहेत. राजारामबापू कारखान्याचा ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे पेटविण्यात आला, तर क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यात बलवडी फाटा येथे गुरुवारी रात्री उशिरा पेटविण्यात आला. विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदूळवाडी येथेच पेटविण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

हेही वाचा: "कंगनाचं ते वक्तव्य चुकीचं पण..."; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी केली आहे. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनीच एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. अन्य दोन कारखाने जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, राजारामबापू, क्रांती आणि विश्वास कारखाने काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. त्यामुळेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत. बुधवारी राजारामबापू कारखान्याच्या ३५ वाहनांची हवा सोडण्यात आली होती.

यापूर्वी तासगाव तालुक्यात कुमठे फाटा, कडेगाव तालुक्यात रामपूर फाटा या ठिकाणी वाहनाची हवा सोडून वाहतूक बंद पाडली. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दोन वेळा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांवर मोटारसायकल फेरी काढण्यात आली. तरीही एकरकमी एफआरपी जाहीर होत नाही. त्यामुळे आंदोलन हिंसक वळणावर पोहचले असून, ते आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

सांगलीत का जमत नाही : खराडे, राजोबा

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्याला जे जमते ते सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना का जमत नाही. दोन्ही जिल्ह्यांत किती अंतर आहे. त्या ठिकाणी सहकारी आणि खासगी अशा दोन्ही कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली आहे. सहकारातील १५ ते २५ वर्षे सुरू असलेले कारखाने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आमचे कार्यकर्ते आणि शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यातूनच पेटवापेटवी सुरू आहे. आमचे कार्यकर्ते नाइलाजाने हे करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा अंत न बघता तत्काळ एकरकमी एफआकरपी जाहीर करावी.’’

loading image
go to top