आजोबा, वडील, चुलते, भावांनंतर आता मुलगीही गाजवतेय कुस्तीचा फड

आजोबा, वडील, चुलते, भावांनंतर आता मुलगीही गाजवतेय कुस्तीचा फड

कुर्डू (ता. माढा, जि. सोलापूर) : येथील ढाणे कुटुंब हे पंचक्रोशीत कुस्ती क्षेत्रात नावाजले आहे. या कुटुंबातील महिलाही मागे नाहीत, हे संजीवनी ढाणे हिने दाखवून दिले आहे. घरात आजोबापासूनच कुस्तीचा वारसा असून चुलते, भावांनी कुस्ती क्षेत्रात नाव कमावले असून याच घराण्यातील संजीवनीने देशपातळीवर आपल्या गावाचे व घराण्याचे नावं शालेय कुस्ती स्पर्धेत गाजवले आहे. 

संजीवनी ढाणे ही सध्या येथील नागनाथ विद्यालयात शिक्षण घेत असून पाचवीत आल्यापासून कुस्तीच्या सरावाला तिने सुरवात केली. सरावासाठी महिला नसल्याने संजीवनीने दररोज तालमीत मुलांबरोबर कुस्ती खेळत सराव केला. ती 2018 मध्ये सहावीत गेल्यावर शालेय कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊन करिअरला सुरवात केली. ऑगस्ट 2018 मध्ये तिने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. यानंतर तिची जिल्ह्यासाठी निवड झाली. या स्पर्धेत ऑक्‍टोबर 2018 मध्ये जिल्हास्तरावरही तिने प्रथम क्रमांक मिळवल्याने विभागासाठी निवड झाली. विभागाची स्पर्धा ऑक्‍टोबर 2018 मध्ये पुणे येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवून संजीवनी राज्यात पहिली आली. राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना समोरच्या प्रतिस्पर्ध्याला तिने एकही गुण मिळू दिला नाही. 2019 मध्ये 36 किलो वजन गटात परत ती राज्यात पहिली आली. यानंतर ऑक्‍टोबर 2019 मध्ये दिल्ली येथे झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत संजीवनी हिने महाराष्ट्राला पदक मिळवून गावाचे व शाळेचे नाव देशपातळीवर नेले. 

वडील शिवाजी धोंडिबा ढाणे, चुलते शहाजी धोंडिबा ढाणे, चुलते संभाजी ऊर्फ अण्णासाहेब ढाणे यांनी आपल्या कारकीर्दीत प्रत्येक यात्रेतील कुस्ती फड गाजवले आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सूरज शिवाजी ढाणे याने पुणे विभागीय पातळीवर नाव कमावले असून तो सध्या पंढरपूर येथे बारावीत शिक्षण घेत आहे. करण शहाजी ढाणे हाही पंढरपूर येथे बारावीत शिक्षण घेत असून त्याने शालेय कुस्ती स्पर्धेत राज्याला 2017 मध्ये कांस्यपदक व 2019 मध्ये रौप्यपदक मिळवून दिले आहे. 2017-18 मध्ये कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळवले आहे. तर संग्राम अण्णासाहेब ठाणे हा इयत्ता नववीत शिक्षण घेत असून त्यानेही शालेय कुस्ती स्पर्धेत पुणे विभागापर्यंत मजल मारली आहे. तसेच शिवम अण्णासाहेब ठाणे इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असून तो 11 वर्षांचा आहे. तालमीतल्या पैलवानाबरोबर गडावर हजेरी लावून 11व्या वर्षांपासून आज आपली कुस्तीची कला दाखवत आहे. तर सिद्धार्थ शहाजी ढाणे सात वर्षांचा असून तोही कुस्ती सराव करत आहे. 

वस्ताद अण्णासाहेब ढाणे यांनी त्यांचे दोन भाचे अण्णासाहेब प्रकाश जगताप व गणेश प्रकाश जगताप हे इंटरनॅशनल पैलवान केले आहेत. अण्णासाहेब जगताप यांनी 2009 मध्ये उझबेकिस्तान येथे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तो सध्या रेल्वेमध्ये टीसी या पदावर कार्यरत असून पुणे येथील काकासाहेब पवार कुस्ती संकुल येथे सराव करत आहे. गणेश जगताप याने 2016 मध्ये कझाकस्तान येथे भारताचे नेतृत्व केले व 2019 ला युनिव्हर्सिटी नॅशनल कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. तो सध्या पुणे येथील काकासाहेब पवार कुस्ती संकुल येथे सराव करत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com