निमशिरगाव बनणार संविधान जाणिवांचे गाव

डॉ. प्रमोद फरांदे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

भारत हा संविधानावर चालणारा देश आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने संविधानाबाबत साक्षर होऊन त्यातील मूल्यांचा स्विकार करणे हेच खरे देशहित आहे. लोकांमध्ये संविधानात्मक मूल्ये रूजवून लोकशाही तळागाळात रुजविण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समिती (अंनिस)सह अनेक सामाजिक संघटना राज्यात अनेक वर्षांपासून काम करीत आहेत.

कोल्हापूर - निमशिरगाव (ता. शिरोळ) हे संविधान सभेचे सदस्य असलेल्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे गाव. या गावाला सामाजिकदृष्ट्या महत्व आहे. आता हे गाव संविधानाबाबत जागृत होत "संविधान जाणीवाचे गाव' म्हणून राज्यात वेगळी ओळख निर्माण करीत आहे. त्यासाठी अंनिसतर्फे गेल्या दोन वर्षांपासून गावात विविध उपक्रम राबविले जात आहेत. एकूण चार टप्यात हे काम जाणार आहे. यातील पहिला टप्पा पूर्णही झाला आहे. 

भारत हा संविधानावर चालणारा देश आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने संविधानाबाबत साक्षर होऊन त्यातील मूल्यांचा स्विकार करणे हेच खरे देशहित आहे. लोकांमध्ये संविधानात्मक मूल्ये रूजवून लोकशाही तळागाळात रुजविण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समिती (अंनिस)सह अनेक सामाजिक संघटना राज्यात अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. अंनिसचे सध्याचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला संविधान बांधिलकी महोत्सव, संविधान जागर यात्रा अशा विविध उपक्रमातून राज्य पिंचून काढला. लोकांमध्ये जावून 125 हुन अधिक संविधन जागृतीचे कार्यक्रम केले. यामध्ये चर्चा, परिसंवाद, कार्यशाळांसह कार्यकर्त्यांनी संविधानावर तयार केलेले पोवाडे, ओव्या, अभंग, भारुड, रिंगण नाट्य असे प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले.

संविधानात्मक मूल्यावर प्रकाश टाकणारे सुमारे 350 फिल्मसचा संग्रह करुन त्या दाखविल्या गेल्या. सुनिल स्वामी यांनी संविधान जाणिवांच गाव ही संकल्पना मांडली. सर्वांनी ती उचलून धरली. 2017 साली कोल्हापूर जिल्ह्यात 12 तालुक्‍यात संविधान जागर यात्रा 52 कार्यक्रम झाले. याचा शेवट निमशिरगाव गावात झाला. गावकऱ्यांना "संविधान जाणिवांचे गाव' ही संकल्पना सांगितली. गावकऱ्यांनाही ती आवडली आणि संकल्पना राबविण्यास सुरुवात झाली. यासाठी चार टप्पे करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात गावातील सर्व कार्यालये, शाळा, घरांमध्ये संविधानाची प्रस्तावना भेट देऊन भितींवर लावण्यात आली.

सार्वजनिक मंडळे, बचत गटाच्या कामकाजाच्या चर्चेत सर्व सदस्यांचा सहभाग वाढून त्यांच्यामध्ये लोकशाही रुजवावी यासाठी प्रयत्न झाला. दुसऱ्या टप्प्यात लोकांमध्ये संविधानातील मूल्ये समाजावीत व त्याची आज किती गरज आहे हे समजावेत यासाठी संविधान ग्रेट भेट हे पुस्तक गावातील प्रत्येक कुटुंबात, शाळा, कार्यांलयांमध्ये दिले जाणार आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्याचे वाचन करून त्यावर आधारित विविध स्पर्धा, प्रश्‍नमंजूषा, चर्चामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यात गावात संविधानातील वैशिष्टये, मूल्यांची फलक, संदेशपर पाट्या , शिल्प उभारली जाणार आहे. तसेच एका मोठ्या हॉलमध्ये संविधासंबंधी, संविधानातील सहभागी व्यक्तींची माहिती आदी बाबींची सविस्तर माहिती देणारे कार्यमस्वरूपी प्रदर्शन असेल. संविधान समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारे हे प्रदर्शन लोकांना पाहण्यासाठी नेहमी खुले असेल. चौथ्या टप्प्यात गावात वर्षातून किमान एकदा संविधान छावणी भरविली जाईल. यात राज्याभरातून किमान 50 लोक सहभागी होऊन संविधान समजून घेतील व संविधानाची लोकांमध्ये जागृती निर्माण करतील. 

लोकांचा मोठा प्रतिसाद 

व्यक्ती, कुटुंब, समाज, समूहामध्ये संविधानिक मूल्ये रूजविसाठी लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जात आहे.  या अनोख्या उपक्रमासाठी गावातील लोकांचा पहिल्यापासून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे अंनिसचे कार्यकर्ते, संविधानाचे युवा अभ्यासक राजवैभव शोभारामचंद्र यांनी सांगितले. 

वैशिष्टपूर्ण उपक्रम

संविधानात्मक मूल्य मानणारा समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने अंनिस उपक्रम राबवित असते. संविधान जागृतीचे गाव हा आमचा वैशिष्टपूर्ण उपक्रम आहे. एक टप्पा पूर्ण झाला असून सर्व टप्पे लवकर पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे.

- सुनिल स्वामी, राज्य प्रशिक्षण कार्यवाहक, अंनिस, इंचलकरंजी 

गाव देशात आदर्श बनविण्याचा आमचा संकल्प

संविधानावर सही करणारे देशभक्त रत्नाप्पाण्णा हे आमच्या गावचे असल्याचे आम्हाला सार्थ अभिमान अभिमान आहे. गावातील प्रत्येकांमध्ये लोकशाहीची मूल्ये रुजवून हे गाव देशात आदर्श बनविण्याचा आमचा संकल्प आहे.

- प्रा. शातांराम कांबळे, ग्रामस्थ, निमशिरगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanvidhan Din Special Story On Nimshirgaon