तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती बाळगा : डॉ. अनिल पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजच्या सभागृहात रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या सातारा भूषण पुरस्काराचे वितरण डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले.

सातारा ः जग बदलत असून, नवे क्रांतीचे पर्व येत आहे. आजच्या डिजिटायझेशनच्या युगात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती अंगी बाळगणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी केले.
 
येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजच्या सभागृहात रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या सातारा भूषण पुरस्काराचे वितरण डॉ. पाटील यांच्या हस्ते क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड या सायबर सिक्‍युरिटी क्षेत्रातील संस्थेचे संस्थापक डॉ. कैलास व डॉ. संजय काटकर यांना प्रदान करण्यात आला. राेख रक्कम 30 हजार, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. त्या वेळी डॉ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील होते. व्यासपीठावर रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टचे विश्‍वस्त अरुण गोडबोले, अशोक गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले उपस्थित होते.

हेही वाचा - शिवेंद्रसिंहराजेंचा टोल नाका बंदचा निर्धार
 
डॉ. पाटील म्हणाले, ""रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या माध्यमातून गोडबोले कुटुंबीयांनी सातारा शहराला सामाजिक, बौद्धिक, आर्थिक वारसा दिला आहे. क्विक हीलच्या माध्यमातून डॉ. कैलास व डॉ. संजय काटकर यांनी साताऱ्याबरोबरच देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. आता आपण उतरू इच्छितो त्या क्षेत्रात काटकर बंधूंनी केव्हाच क्रांती घडविली आहे. सध्याचे युग हे डिजिटायझेशनचे आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या जोरावर बॅंका, शेअर मार्केट आदींचे कामकाज चालत आहे. आगामी काळात 71 टक्के कामे ही यंत्रणांच्या माध्यमातून होतील. त्यामुळे बदलत्या जगाची माहिती घेऊन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती बाळगणे आवश्‍यक आहे.''

हेही वाचा -  सातारकरांच्या दातांच्या काळजीसाठी आता सिव्हीलमध्ये आधूनिक डेंटल चेअर
 
प्रा. बानुगडे म्हणाले, ""आगामी काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कला कौशल्य आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. नव्या कल्पना सूचाव्यात, यासाठी आपल्याकडे शिक्षण पद्धत नसल्याची खंत वाटते. युवकांनी नव्या नव्या संधी शोधाव्यात. ''
 
या वेळी काटकर बंधूंनी क्‍क्‍कि हीलच्या यशाचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. शिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकता. फक्त तुम्हाला नावीन्याचा शोध घेता आला पाहिजे, असेही काटकर बंधूंनी नमूद केले.

अवश्य वाचा - महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये
 
प्रद्युमन गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अच्युत गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. अरुण गोडबोले यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Bhushan Purskar Awarded To Quik Heal Director Dr.Kailas Katkar