Video : आता सर्व काही सातारकरांवरच अवलंबून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी आपल्याला या संकटाचा सामना करत रहाटगाडा सुरू ठेवावा लागणार आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझरचा वापर करत शारीरिक अंतर राखण्याचे काम सर्वांना अत्यंत कसोशीने पार पाडावे लागणार आहे. अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येकाला कोरोनाच्या चक्रातून जावे लागू शकते. त्यामुळे सवलत मिळाली; पण गाफील राहिल्यास काळ नक्की ग्रासेल, अशीही परिस्थिती आहे. त्याचा सर्व नागरिकांनी एकीने मुकाबला करणे आवश्‍यक आहे. 

सातारा : जनता कर्फ्यूनंतर बरोबर दोन महिन्यांनी आज (शुक्रवार) बाजारपेठ खुली झाली आहे. बाहेर पडण्यासाठी मैदान खुले झाले आहे. परंतु, धोका अधिक वाढलेला आहे. कोरोनारूपी काळ प्रत्येकावर घाला घालण्यासाठी टपून बसला आहे. त्यामुळे सवलत मिळालेली ही वेळ गाफील राहण्याची नाही तर, अधिक काळजी घेण्याची बनली आहे. 

सोमवारपासून (ता. 18) देशामध्ये चौथ्या लॉकडाउनला सुरवात झाली. या वेळी झोन ठरविण्याबाबतचे अधिकार केंद्राने राज्यांना दिले. त्यानुसार मंगळवारी (ता. 19) राज्य शासनाने अध्यादेश काढला. त्यानुसार राज्यातील ठराविक महानगरपालिका क्षेत्र वगळता अन्य परिसर हा "नॉन रेड झोन' असल्याचे जाहीर केले. त्याबरोबर या भागासाठी सूट जाहीर केली. त्यामध्ये गेले दोन महिने बंद असलेल्या बाजारपेठांमधील सर्व प्रकारची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून हे निर्देश संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागू केले. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दोन महिने दुकाने बंद होती. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्‍यक कारणाशिवाय बाहेर पडता येत नव्हते. परिणामी रस्त्यावर असणारी नागरिकांची गर्दीही कमी होती. त्यामुळे शारीरिक अंतर राखण्याला फारशा मर्यादा येत नव्हत्या. पोलिसांनाही ठराविक दुकानांवर लक्ष ठेवणे शक्‍य होते. त्यामुळे सर्वत्र नाही परंतु, बऱ्याच ठिकाणी नियमांचे पालन होत असल्याचे दिसत होते. परंतु, दुकाने बंद असल्यामुळे नागरिकांनाही कोंडल्यासारखी भावना निर्माण झाली होती. आर्थिक स्त्रोतच खुंटले असल्याने कधी एकदा सर्व मोकळे होईल, असे बहुतांश जणांना वाटत होते. आजपासून ती अपेक्षा पूर्ण झाली आहे. नियम व अटींचे पालन करण्याच्या अटींवर सर्व दुकाने, सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतु, भीतीचे सर्व प्रश्‍न संपल्यामुळे ही मोकळीक दिलेली नाही. सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक स्त्रोत सुरू व्हावा, यासाठी नाईलाजास्तव घेतलेला हा निर्णय आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्‍यक आहे. लॉकडाउन सुरू झाले तेव्हा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. आजअखेर कोरोनाचे 201 रुग्ण झाले आहेत. जिल्ह्यातील महाबळेश्‍वर वगळता प्रत्येक तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. परजिल्हा व परराज्यांतून नागरिकांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेले 15 दिवस दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही पाचवर गेली आहे. तर, तीन संशयितांचाही मृत्यू झालेला आहे. सापडलेल्या बाधितांमध्ये गंभीर बाब अशी आहे की, प्रशासनाने कॉंटॅक्‍ट ट्रेसिंग केल्यामुळे ते सापडलेत. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे आपल्याकडे लक्षणे दिसण्याचा कालावधी मोठा असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा परिस्थितीत कोण विषाणूंचे वाहक आहे आणि कोण नाही, हे समजणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे अत्यंत भयावह अशी बाहेरची परिस्थिती आहे. 

'सौ दाऊद, एक राऊत' ग्रुपवर हे काय सुरू आहे, एकदा पाहाच... 

अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी... 

अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी आपल्याला या संकटाचा सामना करत रहाटगाडा सुरू ठेवावा लागणार आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझरचा वापर करत शारीरिक अंतर राखण्याचे काम सर्वांना अत्यंत कसोशीने पार पाडावे लागणार आहे. अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येकाला कोरोनाच्या चक्रातून जावे लागू शकते. त्यामुळे सवलत मिळाली; पण गाफील राहिल्यास काळ नक्की ग्रासेल, अशीही परिस्थिती आहे. त्याचा सर्व नागरिकांनी एकीने मुकाबला करणे आवश्‍यक आहे. 
50 कुटुंबांना मदत करुन नव दांपत्य संसार वेलीवर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Citizens Gathered In Market After The Lockdown Reilef In City