esakal | चर्चा तर हाेणारच...सातारा पालिकेची चर्चाच चर्चाच
sakal

बोलून बातमी शोधा

चर्चा तर हाेणारच...सातारा पालिकेची चर्चाच चर्चाच

सातारा पालिका अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र करणार आहे. संपूर्ण शहरातील अतिक्रमणांवर या दरम्यान कारवाई होणार आहे. आणखी किमान दहा दिवस ही मोहीम सुरू राहण्याची शक्‍यता आहे. या मोहिमेमुळे अतिक्रमीत व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील प्रत्येक टपऱ्यांवर मोहिमेचीच चर्चा होती.

चर्चा तर हाेणारच...सातारा पालिकेची चर्चाच चर्चाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा  ः सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर सातारा पालिकेने शहरातील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. मोहिमेच्या पहिल्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरातील एजंट व चहाच्या टपऱ्यांची अतिक्रमणे काढण्यात आली. या वेळी काही ठिकाणी अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांची अतिक्रमण करणाऱ्यांबरोबर वादावादीही झाली.
 
पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वच नगरसेवकांनी अतिक्रमणांच्या मुद्द्यावर पालिका प्रशासनाला धारेवर धरले. अतिक्रमणांवर ठोस कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारपासून अतिक्रमण मोहीम सुरू करणार असल्याचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सभागृहात सांगितले. त्यानुसार आज सकाळी पालिकेने अतिक्रमणांविरोधी मोहीम सुरू केली. मुख्याधिकारी शंकर गोरे, बांधकाम अभियंता भाऊसाहेब पाटील यांच्यासह सात अभियंते, चार भाग निरीक्षक, दहा बिगारी, अतिक्रमण मोहिमेचे शैलेश अष्टेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयापासून मोहिमेला सुरुवात झाली. या परिसरात एजंटांनी पदपथावर अतिक्रमणे केली होती, तसेच चहाच्या टपऱ्याही मोठ्या प्रमाणावर थाटल्या होत्या. सुरवातीला एका मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या अतिक्रमणावर दणका बसला. या वेळी अतिक्रमणे काढू नयेत, यासाठी पथकाबरोबर वादावादी सुरू झाली; परंतु पथकाने कोणालाही न जुमानता कारवाई सुरू केली. या ठिकाणी करण्यात आलेली पक्की बांधकामे जेसीबीच्या साहायाने काढण्यात येत होती. अतिक्रमण कारवाईचा धडका बघून अन्य एजंटांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. त्यांना पथकाने थोडा कालावधी दिला. या दरम्यान परिसरातील चहाच्या टपऱ्या उचलून अतिक्रमण विभागाच्या गाड्यांमध्ये भरण्यात आल्या. काहींनी तेथेही आठकाठी आणण्याचा प्रयत्न केला; परंतु पथकाने त्यांचे ऐकले नाही. ही माेहिम दिवसभर याच परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू होती. एजंटाची अतिक्रमणे पूर्णपणे काढली जात नाहीत तोपर्यंत पथकाचे कर्मचारी त्या ठिकाणी थांबून होते. 

दहा दिवस मोहीम चालणार 

संपूर्ण शहरातील अतिक्रमणांवर या दरम्यान कारवाई होणार आहे. आणखी किमान दहा दिवस ही मोहीम सुरू राहण्याची शक्‍यता आहे. या मोहिमेमुळे अतिक्रमीत व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील प्रत्येक टपऱ्यांवर मोहिमेचीच चर्चा होती.

वाचा : कास (सातारा) : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी तिने स्विकारले लाखाे रुपये अन्...


हेही वाचा : ...अन् अजित पवारांनी साताऱ्यात मागितला पूरावा

वाचा :  सातारा : आरोपी न करण्यासाठी फाैजदार अडकला लाखाेंच्या माेहात

loading image