esakal | ...अन् अजित पवारांनी साताऱ्यात मागितला पूरावा
sakal

बोलून बातमी शोधा

...अन् अजित पवारांनी साताऱ्यात मागितला पूरावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शासकीय विश्रामगृहात खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. या वेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

...अन् अजित पवारांनी साताऱ्यात मागितला पूरावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : साताऱ्यातील शासकीय मेडिकल कॉलेजचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लावून त्यासाठी अर्थसंकल्पातून तरतूद करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे अधिकाऱ्यांची कमराबंद बैठक घेतली. या बैठकीत प्रत्यक्ष आराखडा, पदनिर्मिती, होस्टेल उभारणीची माहिती घेऊन अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्यात सुमारे 80 ते 100 कोटींचा निधी उपलब्ध करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दाखवली. मेडिकल कॉलेज सुरु व्हावे हे हे माझे स्वप्न आहे. ते मी पूर्ण करणारच, अशी ग्वाहीही त्यांनी बैठकीत दिली.
 
साताऱ्याचे मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून रखडला आहे. तो प्रश्‍न निकाली लावण्यासाठी मी शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. त्यासाठी पुण्याहून अधिकाऱ्यांना मी बोलावले असून, साताऱ्यातील खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह बांधकाम, पाटबंधारे विभागासह नियोजनचे अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह हे बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीला जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""साताऱ्यातील शासकीय मेडिकल कॉलेजचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आलो आहे. मेडिकल कॉलेजचा आराखडा प्रवेश प्रक्रिया पदनिर्मिती, होस्टेलची उभारणी याबाबत चर्चा करून ते अंतिम करण्यासोबतच अर्थसंकल्पातून निधीची तरतूद किती करावी लागेल, याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांसोबतच्या कमराबंद बैठक घेतली. मेडिकल कॉलेजला पहिल्या टप्प्यात 80 ते 100 कोटींचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पातून दिला जाऊ शकतो.''
 
या वेळी भिलारमधील पुस्तकाचे गाव प्रकल्प गुंडाळण्याचा प्रकार राज्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्रालयातील सचिवांकडून सुरू असल्याबाबतचा मुद्दा पत्रकारांनी मांडला. त्यावर त्यांनी "काही पुरावा आहे का? असेल तर दाखवा,' असे स्पष्ट केले. या वेळी मकरंद पाटील यांनी भिलारची नेमकी माहिती त्यांना दिली. गटविकास अधिकाऱ्यांना आलेल्या आदेशाची प्रत पाहिल्यावर "पुस्तकाचे गाव' प्रकल्प गुंडाळण्याबाबत मुंबईत गेल्यावर प्रत्यक्ष माहिती घेऊ, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. मर्ढे येथील कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटनासंबंधी त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना पालकमंत्री व स्थानिक आमदारांनी आजपर्यंत का निर्णय घेतला नाही, असा प्रश्‍न केला. मंत्रालयातील बैठकीत हा मुद्दा चर्चेस घेऊन आजपर्यंत स्मारकाचे उद्‌घाटन का झाले नाही, याची नेमकी चौकशी करून निर्णय घेऊ, असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान, अजित पवार यांचे शासकीय विश्रामगृहात खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. या वेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

वाचा : आता हे आव्हान आपल्याला पेलायचे आहे : शरद पवार

हेही वाचा : विरोधी पक्ष नेता म्हणाले, मुलींसाठी तो फैसला ऑन द स्पॉट

जरुर वाचा : साताऱ्याचे 'हे' नेते चालले पुन्हा राष्ट्रवादीत

नक्की वाचा : वाचनप्रेमींसाठी धक्कादायक बातमी; पुस्तकांचं गाव गुंडाळणार ?

 

loading image