पृथ्वीराज चव्हाण यांच्या चुलत भावाचे निधन

सचिन शिंदे
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना शासनाचा कृषी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. भाई चव्हाण यांचा जन्म पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथे १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला.

कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जटणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे ज्येष्ठ चुलत बंधू भाई पंजाबराव चव्हाण (वय ९३) यांचे पुणे येथे शुक्रवारी रात्री निधन झाले.

शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना शासनाचा कृषी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. भाई चव्हाण यांचा जन्म पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथे १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. त्याच गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक व काॅलेजचे शिक्षण कोल्हापूर तर पुढील शिक्षण इंन्दूर येथे झाले. त्यांचे चुलते व तत्कालीन केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण यांच्यासोबत त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली. १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते सक्रीय होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी नेहमीच लढा दिला.

१९६० ते १९६४ कालावधीत त्यांनी रेठरे बुद्रूक येथील कृष्णा कारकान्यात सेक्युरिटी आॅफीसर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी शेतीत लक्ष घातले. कऱ्हाड तालुक्यातील मालखेड, कुंभारगाव व पुणे जिल्ह्यात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. चाळीस वर्ष शेती करताना त्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग राबवले. त्याची दखल शासनासह वेगवेगळ्या वृत्त वाहिन्यांनी घेतली होती. अलीकडे वयोमानाने ते फारसे फिरत नव्हते. त्यांची प्रकृती वयोमानाने साथ देत नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील रूबी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच त्यांची प्राणज्योत काल मालवली. दुपारी त्याचे येथे आणण्यात येणार आहे. मलकापूर येथे त्यांच्या निवासस्थानी ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर अंत्यविधी होणार असल्याचे सांगण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Satara news Bhai Punjabrao Chavan passes away