थंड पाचगणी... काेराेनाच्या फटक्याने गरम

go corona... come tourist
go corona... come tourist

पाचगणी (जि. सातारा) : पर्यटनस्थळ व शैक्षणिक केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर नोंद झालेल्या पाचगणीतील जनजीवन पूर्णतः पर्यटक व निवासी शाळांवर अवलंबून असल्याने येथील व्यवसायाची विस्कटलेली आर्थिक घडी कशी बसणार? या विवंचनेत हॉटेलसह अन्य व्यावसायिक आहेत. आर्थिक उत्पन्नाचा मुख्य आधार असलेला उन्हाळी हंगाम वाया गेल्याने आता येणाऱ्या हंगामाच्या आशेवर व्यावसायिक आहेत. मात्र, हे सर्व कोरानाच्या संकटावर मात करण्यावरच अवलंबून आहे. 

थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण 


समुद्र सपाटीपासून 4 हजार 378 फूट उंचीवर वसलेल्या पाचगणीचा 1852 मध्ये शोध लागला असला, तरी पहिली निवासी शाळा 1885 मध्ये, तर हॉटेल व्यवसाय 1912 मध्ये सुरू झाला. पाचगणीत हॉटेल व्यवसाय सुरू होऊन आज 108 वर्षे झाली. या व्यवसायाने अनेकदा चढउतार पाहिले असले, तरी यावर्षी उद्‌भवलेल्या कोरोनाच्या संकटाने हॉटेलसह पर्यटन उद्योगावर अवलंबून असलेल्या जनजीवनाला जखडून टाकले आहे. 

उन्हाळी हंगामाची तयारी 


येथील हॉटेल असोसिएशनचे सदस्य शाहाराम जवानमर्दी यांनी कोरोनामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाविषयी माहिती दिली. दरवर्षी उन्हाळी हंगामासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी परिसराचे सुशोभीकरण, बागबगीचांची सफाई, स्वीमिंग पुलाची स्वच्छता अशी विविध प्रकारची तयारी हॉटेल व्यावसायिक जानेवारीपासूनच सुरू करतात. यावर्षी सुद्धा ही तयारी झाली; पण येणाऱ्या हंगामाच्या प्रतीक्षेत असतानाच कोरोनाचे ग्रहण लागले अन्‌ व्यावसायिकांच्या आशा धुळीस मिळाल्या. पाचगणीत अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नसला, तरीही भयाचे सावट गडद असल्याने पुढील भवितव्य धसूरच दिसते. 

दिवाळी हंगाम तरी मिळणार का? 


एप्रिल, मे, वर्षा ऋतूंत सलग येणाऱ्या सुट्या, त्यानंतर दीपावली, नाताळच्या सुट्या व शाळेतील कार्यक्रमानिमित्ताने दाखल होणाऱ्या पालकांमुळे हॉटेल व्यावसायिकांना उत्पन्नाची चांगली संधी मिळते. अनेक हॉटेल्समध्ये उन्हाळी, पावसाळी हंगाम, तर काही पर्यटकांनी दीपावली व नाताळच्या सुटीचे आगाऊ आरक्षण करून ठेवलेले असते. पाचगणीचे जनजीवन पूर्णतः पर्यटक व निवासी शाळावर अवलंबून असल्याने येथील अर्थकारणच मोडकळीस येत असले, तरी जनजीवन किती दिवस अंधारमय वातावरणात राहणार, अशी चिंता व्यक्त होत आहे. 

निवासी शाळा कधी सुरू होणार? 


निवासी शाळा नेमक्‍या कधी सुरू होणार? शाळांमुळे मिळणारा रोजगार, व्यवसायाच्या संधीविषयी सर्वत्र साशंकता व्यक्त होत आहे. 


काेरोनाने डोके वर काढल्याने यावर्षी उन्हाळी हंगाम बारगळला. पुढील आरक्षण रद्द होऊ लागली असून, बहुतांश पर्यटकांनी अरक्षणापोटी दिलेल्या रकमेची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. वर्षानुवर्षेचा रुजू असलेला कामगारवर्ग सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. हॉटेल देखभालीच्या खर्चाची समस्या तोंड वासून बसली आहे. 

- शाहाराम जवानमर्दी, सदस्य, हॉटेल असोसिएशन, पाचगणी 
 

जिवाचा धोका पत्करुनही परिचारीका तीन महिने पगारविना https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-temporary-nurses-didnt-get-three-months-salary-291597

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com